शिर्डी. :
“आमचे दुकान चे काम चालु असून काम पूर्ण होईपर्यंत रस्त्यावर हातगाड्या टपऱ्या टाकण्यासाठी परवानगी द्यावी “अशा आशयाचे पत्र देत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी नगरपरिषदच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अतिक्रमण करण्याची परवानगी मागितली आहे. या उपरोधिक पत्रामध्ये काळे यांनी साई बाबा संस्थानने केलेल्या अतिक्रमणाचा दाखला देत प्रशासनाला कोंडीत पकडले आहे.
आपल्या पात्रात काळे यांनी म्हटले आहे की श्री साईबाबा संस्थान ने सन २००९ मध्ये बेकायदेशीररित्या पिंपळवाडी रस्त्यावर म्हणजे त्यावेळच्या प्रमुख जिल्हा मार्गावर व आताच्या राज्य महामार्ग वर शेड टाकून अतिक्रमण केलेले आहे..
दिनांक २४/६/२०१० रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी शेड तात्काळ काढण्याचे आदेश दिलेले असताना ही नगर परिषद आणि साईबाबा संस्थान या दोन्हीही शेड काढण्याची तसदी घेतली नाही. याबात काळे यांनी पालिकेला विचारणा केली असता पालिका प्रशासनाने संस्थान चे नवीन दर्शन रांगेचे काम पूर्ण होताच ते शेड काढून घेणार असल्याचे संदर्भीय पत्राद्वारे काळे याना कळविले आहे.
याबाबत काळे यांनी पालिकेला भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद १४ चा विसर पडलेला आहे. साईबाबा संस्थान चे काम पूर्ण होईपर्यंत आपण अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी बारा वर्ष म्हणजे एक तप वाट कसे पाहू शकता असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे
गोरगरीब जनतेचे रस्त्याचे कडेला असलेले अतिक्रमण आपण युध्द पातळीवर काढलेत. गेल्या बारा वर्षे हे अतिक्रमण आपणास जिल्हाधिकारी यांचे आदेश असून देखील काढले नाही. याचा अर्थ पालिका प्रशासन वरिष्ठ कार्यालयाचे आदेश न पाळण्या इतके मुजोर झाले असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे .
काळे यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की मी शिर्डी मध्ये दुकान थाटण्यासाठी जागा शोधत आहे. जागा शोधून मी बांधकाम करणार आहे. तोपर्यंत शिर्डी पिंपळवाडी रस्त्यावर ह्या संस्थान चे शेड शेजारी मला रस्त्याचे कडेला रहदारीला संस्थान प्रमाणे अडथळा न करता व्यवसाय करायचा आहे.
आपण व आपले कार्यालय जसे संस्थान चे ऐकून बारा वर्षे त्यांना रस्त्यावर शेड टाकून निम्मा रस्ता अडवून देऊ शकता तर भारतीय राज्यघटना चे अनुच्छेद १४ प्रमाणे समन्याय वापरुन मला व माझ्या सारख्या इच्छुकांना परवानगी द्यावी..अशी उपरोधिक मागणी काळे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.