गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांना बुधवारी (28 डिसेंबर) अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
यावर्षीच 18 जूनला पंतप्रधान मोदी यांनी हीराबेन यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला होता. आपल्या आईच्या शंभराव्या वाढदिवसासाठी ते गांधीनगरला गेले होते.
हिराबेन यांना 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक भावूक ब्लॉगही लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, “आज मी माझा आनंद, सौभाग्य तुमच्या सगळ्यांसोबत वाटतोय. माझी आई आज 18 जूनला शंभराव्या वर्षांत प्रवेश करत आहे. म्हणजेच तिचं जन्म शताब्दी वर्ष सुरू होतंय. आज माझे वडील असते, तर गेल्या आठवड्यात तेसुद्धा शंभर वर्षांचे झाले असते.” पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिलं होतं, “आज माझ्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, माझ्या व्यक्तिमत्त्वात जो चांगुलपणा आहे. तो माझ्या आई-वडिलांमुळेच आहे. इथे दिल्लीत असताना कितीतरी जुन्या गोष्टी आठवत आहेत.” “माझी आई जेवढी सामान्य आहे, तितकीच असमान्यही….प्रत्येकाचीच आई अशी असते. आज मी माझ्या आईबद्दल लिहित आहे, वाचताना तुम्हाला वाटू शकतं की, अरे…माझी आईही अशीच आहे. ती पण असंच वागायची. हे वाचताना तुमच्या मनात तुमच्या आईची प्रतिमा उभी राहील.”