संगमनेर : राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होत असून जिल्हा परिषदे मधील प्राथमिक शिक्षकांच्या जागा तातडीने भरणे गरजेचे असून सरकारने शिक्षकांच्या सर्व जागांसाठी तातडीने भरती करावी अशी आग्रही मागणी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रासह विविध मागण्याही त्यांनी आग्रहपूर्वक मांडल्या.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे आमदार डॉ. तांबे मागणी करताना म्हणाले की, राज्यात आज मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये या रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागा त्वरित भरणे आवश्यक आहेत. हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आहे.शिक्षकांना मुख्यालयात राहण्याची जाचक अट रद्द करावी. शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरावी. मुलींच्या उपस्थिती भत्त्यामध्ये वाढ करावी.याचबरोबर शिक्षण सेवक मानधनात वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे.यासाठी आपण मागील अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित केला होता.त्यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिले होते व त्या अधिवेशनातही तशी घोषणा केली होती. शिक्षण सेवकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय अद्याप घेतला गेला नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे.या महत्त्वाच्या प्रश्नासाठी आपला पाठपुरावा कायम सुरू राहणार असून या शिक्षक सेवकांना आपण न्याय मिळवून देणार असल्याचेही आमदार डॉ. सुधिर तांबे यांनी म्हटले असून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसह विनाअनुदानित शाळांना जाहीर केलेले अनुदान त्वरित मिळावे.वाढीव तुकड्यांना मंजुरी मिळावी.स्वतंत्र कला व क्रीडा शिक्षक त्या विषयासाठी मिळावे. याचबरोबर राजस्थान, छत्तीसगड प्रमाणे राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी आमदार डॉ. तांबे यांनी केली आहे. याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आमदार डॉ.तांबे यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याबाबतचे पत्राद्वारे लेखी उत्तर दिले आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या या आग्रही मागणीमुळे राज्यातील हजारो शिक्षण सेवक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होण्यासाठी पाठपुरावा होणार असून नव्याने भरती होणार असल्याने शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.