नागपूर : “छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे,” अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली आहे.
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना अजित पवार यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांचे वक्तव्य हे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’ अशा पद्धतीचे असल्याचं म्हटलं.
“आपण चुकीचे बोललो हे अजित पवारांच्या लक्षात येईल. संभाजी महाराज हे कालही धर्मवीर होते, आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरपर्यंत राहतील,” असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं.
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे अजित पवारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असं म्हटलं. अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, असंही तुषार भोसले यांनी म्हटलं.
“संभाजी महाराज धर्मवीर नाही, हे म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही संभाजी राजेंचा अवमान करत आहात,” अशी टीका आमदार संजय गायकवाड यांनीही केली.