संगमनेर : संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. साकुर व पठार भागामध्ये आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे जनतेची कामे करतो. हे काही लोकांना पहावत नाही. निवडणुकीत आलेले अपयश म्हणून फक्त राजकीय द्वेषातून या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांनी खोटेनाटे आरोप केले असून राजकीय दबाव टाकून खोट्या केसेस नोंदविल्या आहेत. अशा राजकीय दबावाला सुज्ञ साकूरकर घाबरणार नसून या विकृत राजकारणाचा पठार भागातील जनता पूर्णपणे निषेध करत असल्याची टीका ही थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांनी केली.
इंद्रजीत खेमनर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, २९ डिसेंबर रोजी स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता सुनील इघे याने जोगे पठार येथे राहणाऱ्या ठाकर समाजातील वस्तीवर जाऊन काही मुली व महिला यांचे चुकीचे फोटो काढले व व्हिडिओ बनवला. याबाबत गावातही अत्यंत असभ्य भाषेत गावकऱ्यांशी वर्तन केले. रफिक चौगुले हे शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार त्यांच्यावरही इघेचा राग आहे. विशेष म्हणजे जोगे पठार येथील वस्ती करता सामाजिक कार्यकर्ते रफिक सिकंदर चौगुले यांनी आपल्या शेततळ्यातून सहा वर्षापासून पाणी दिले आहे. याचबरोबर या गावासाठी एक गुंठा जागाही विहिरीसाठी दिली आहे. याबद्दल सर्व जोगे पठार व ग्रांमस्थ यांचे रफिक चौगुले यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत.
मात्र निवडणुकीत आलेल्या अपयशातून इघे याने राजकीय प्रसिद्धीसाठी ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक, सरपंच, तसेच शंकर पाटील खेमनर इंद्रजीत खेमनर व चौगुले यांच्यावर खोटे व बिनबुडाचे आरोप केले. याप्रसंगी इघे याच्याविरुद्ध या भागात राहणाऱ्या समाजानेही आवाज उठवला. इघे तुझा येथे काही संबंध नाही.तू खोटी माहिती देऊ नको. बोगस तक्रारी करू नको. विनाकारण बदनामी करू नको. असे या ग्रामस्थांनी त्याला सांगितले.
यावेळी जनता आपल्याबरोबर नाही हे पाहून त्याने गोंधळ घालण्याचा प्रकार केला. याचबरोबर अत्यंत असभ्य भाषेत त्यांनी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांशी अरेरावी केली.जनतेचा पाठिंबा नाही याचा मनात राग ठेवून आपल्याला राजकीय पाठबळ मिळावे या कारणाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चुकीची माहिती दिली. यावेळी शंकर पा. खेमनर, इंद्रजीत खेमनर, रफिक चौगुले, ग्रामसेवक व इतर २० ते २५ जणांचे खोट्या तक्रारीमध्ये नावे नोंदवली.यामध्ये या लोकांचा अक्षरशा काहीही संबंध नव्हता. फक्त स्वतःची प्रसिद्धी व्हावी व आपल्याला विरोधकांचे पाठबळ मिळावे या उद्देशाने त्यांनी हा उद्योग केला आहे. हे राजकीय षडयंत्रातून झाले आहे. मात्र अशा दबावाला साकुरची जनता कधीही बळी पडणार नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.
चौकट :- साकुर व पठाराचा बंदच्या माध्यमातून पूर्णपणे पाठिंबा
मार्केट कमिटीचे सभापती शंकर पा. खेमनर ,इंद्रजीत खेमनर व रफिक चौगुले यांच्यासह विविध कार्यकर्त्यांवर केलेल्या खोट्या केसच्या निषेधार्थ साकुर गाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला होता. या बंदमधून शंकर पा. खेमनर यांच्या विचारांना जनतेचे समर्थन असून हा स्वयंघोषित पुढारी मात्र उघडा पडला असल्याची टिका रफिक चौगुले यांनी केली.