संगमनेर : महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये मोठया प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या वाढलेल्या चोऱ्यांसह वाढलेले सायबर क्राईम हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिसांनी याबाबत खंबीर भूमिका घेत तातडीने बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावात बोलताना आमदार डॉ तांबे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील प्रगतशील राज्य आहे.मात्र सध्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठे भितीचे वातावरण आहे. याकरता पोलिसांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस मित्र संघटनेची ही मदत घ्यावी तसेच गावागावातील तरुणांनाही या सुरक्षा अभियानात सहभागी करून घ्यावे.तसेच महाराष्ट्रात घडणारे सायबर क्राईमचे गुन्हे हे पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे. म्हणून असे वाढलेले सायबर क्राईमचे गुन्हे व वाढलेल्या चोऱ्या थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणांनी अधिक सतर्कतेने काम करावे.तसेच महाराष्ट्र सरकारने तातडीने नव्याने पोलीस भरती करावी. या पोलीस भरतीसाठी अनेक तरुण अनेक दिवस प्रयत्न करत आहेत, नव्याने भरती करून या विभागातील रिक्त जागा तातडीने भराव्यात अशी आग्रही मागणी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावात सरकारकडे केली आहे.