बिबट्याचा दबा धरून वाहन धारकांवर हल्ला ! गेल्या अनेक महिन्यांपासून थांबलेले बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र पुन्हा सुरू.

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी: 

         गेल्या अनेक महिन्यांपासून थांबलेले बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहेत. केशव गोविंद बन ते केसापूर दरम्यान बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत पहावयास मिळत आहे. येथील केशव गोविंद बन व केसापूर सीमारेषेवर असलेल्या सुनिल पुजारी यांच्या केळीच्या बागेजवळ बिबट्या दबा धरून बसतो आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून हल्ला करत असल्याने वाहन चालकांची भंबेरी उडत आहे. वाहन चालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

              असाच प्रकार केसापूर येतील सरपंच बाबासाहेब पवार यांच्या मुलाच्या वाट्याला आला आहे.  तेजस पवार व त्याचा मित्र मयूर भगत हे मंगळवारी (दि. १०) रात्री ०८ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून केसापूर येथे घराकडे परतत असताना पुजारी यांच्या केळीच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठलाग  करून हल्ला केला. बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात तेजस पवार यांच्या डाव्या पायाच्या पोरीवर बिबट्याच्या धारदार नख्यांनी ओरखडे ओढले आहे. त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती.असे म्हणत पवार व भगत घर गाठले व सुटकेचा निश्वास सोडला. मागील महिन्यात केसापूर सोसायटीचे व्हा. चेअरमन मधुकर रणदिवे यांचे पुतणे आकाश रणदिवे यांच्या पुतण्यावर याच भागात बिबट्याने दुचाकीवर पाठलाग करून हल्ला केला होता.

              या परिसरात व नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात लपण्यासाठी जागा असल्याने बिबट्यांना नित्य संचार आहे. बेलापूर ते आंबी हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असल्याने शेतकरी, दुग्धव्यवसाय करणारे, नोकरदार, विद्यार्थी यांचा मोठा वावर आहे. तसेच जिल्ह्यात नावाजलेले केशव गोविंद मंदिर येथे भक्तांचा मोठया प्रमाणात वावर आहे. सकाळी व संध्याकाळी अनेक भक्त पायी जाऊन दर्शन घेत असतात. अशा परिस्थितीत बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी सरपंच पवार यांनी सातत्याने वन विभागाशी सतत संपर्क करून या भागात पिंजरा लावून या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधी ग्रामपंचायत पत्र द्या मग कार्यवाही करू असे कागदी घोडे नाचवले. वन विभागाचा वेळकाढूपणा भविष्यात एखाद्या विद्यार्थी अथवा वाटसरूच्या जीवावर बेतल्यावरच कारवाई करणार का?  बुधवारी दुपारी उशिरा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थळ निरीक्षण केले.परंतू पुन्हा वन विभागाने माञ मागचे पाढे वाचायला सुरवात केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेला तर त्यास वन विभाग सर्वश्री जबाबदार राहतील असा इशारा येथिल ग्रामस्थांनी दिला आहे.

“गेल्या एक महिन्यापासून वन विभागाच्या संपर्कात आहे. वारंवार या भागातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी करत आहे. मात्र प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरु असून त्यामुळे भविष्यात एखाद्या निष्पाप वाटसरूचा बळी गेल्यास त्यास जबाबदार कोण? त्यामुळे वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद न केल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने बेलापूर- श्रीरामपूर रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.”

बाबासाहेब पवार, सरपंच

केसापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here