संगमनेर : संगमनेरच्या वैभवात भर घालणारे भव्य बस स्थानक उभारण्याची संधी मला मिळाली व तत्कालीन युती सरकारच्या काळात दिनांक २२.०७.२०१६ रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कार्यारंभ आदेशानुसार बांधकाम सुरू केले. तदनंतर मार्च २०१७ रोजी धांदरफळ गट ता. संगमनेर येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने राजकीय द्वेषातूनच धांदरफळवासीय अमोल खताळ यांनी त्यांचे राजकीय वजन वापरून महसूल प्रशासनाची दिशाभूल करून माझ्यावर दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडले असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य आर.एम कातोरे यांनी केला आहे.
याबाबत अधिक बोलताना कातोरे म्हणाले की , सदर बस स्थानकाचे बांधकाम करताना सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन केलेले असून जुने बस स्थानक पाडताना निघालेले मटेरियल उदा. वाळू ,डबर ,मुरूम इ. वापरापोटी परिवहन मंडळास रुपये १७.६८ लक्ष इतके सॅल्वेज रक्कम भरणा केलेली आहे. त्याचे चलन देखील आम्ही सादर केलेले आहे. त्याचप्रमाणे महसूल विभागालाही वेळोवेळी स्वतंत्र चलनाद्वारे रॉयल्टी रक्कम भरणा करण्यात आलेली आहे. तर बांधकामासाठी लागणारे मटेरियल उदा. नैसर्गिक अथवा कृत्रिम वाळू ही आम्ही संबंधित पुरवठादारांकडूनच घेतलेली असून सदर खरेदीपोटी त्यांना आमच्या बँक खात्यातूनच चेकने पेमेंट अदा केलेले असून त्या पुरवठ्यापोटी टॅक्स बिलेही तहसील कार्यालयात सादर केलेली आहेत.त्यामुळे ग्राहक म्हणून सदर पुरवठादारांनी पुरवठा केलेले मटेरियल कुठून व कसे आणले, त्याचा वाहतूक परवाना किंवा इतर कायदेशीर बाबी पाहण्याचा आमचा काहीही संबंध नसताना त्यावरही दंडात्मक कारवाई राजकीय दबावापोटी झालेली आहे. तरी या संदर्भात आम्ही वरिष्ठ कार्यालयात दाद मागणार असून कायदेशीर प्रक्रिया करणार आहोत असे कातोरे म्हणाले.