कॉन्ट्रॅक्टर आर.एम कातोरेंना गौणखनिज प्रकरणी पावणेचार कोटीचा दंड 

0

संगमनेर : बीओटी तत्वावर बांधण्यात आलेले संगमनेर बस स्थानक व व्यापारी संकुल बांधकामात  वापरलेले गौण खनिज अवैध असल्याचे निष्पन्न झाल्याने विकासक व कॉन्ट्रॅक्टर आर.एम कातोरे यांना जवळपास पावणेचार कोटींचा दंड संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी ठोठावला आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी गेल्या पाच वर्षापासून सुरु ठेवलेल्या पाठपुराव्यामुळे हि कारवाई करण्यात आली.  

         संगमनेरमध्ये वाळू, मुरूम, डबर या गौण खनिजाचा लिलाव झालेला नसताना बस स्थानक व व्यापारी संकुल बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात मुळा नदीपात्रातून वाळू उपसा करून ठेकेदार कातोरे यांनी बांधकाम पूर्ण केले. बांधकामासाठी गौणखनिज उत्खननासाठी कुठलीही शासकीय परवानगी घेतली नसल्याची तक्रार अमोल खताळ यांनी २०१८ मध्ये संगमनेरच्या तहसीलदारांकडे केली होती. कॉन्ट्रॅक्टर आर.एम कातोरे जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेस कार्यकर्ते असल्याने त्यांच्यावर कारवाईसाठी दिरंगाई होत होती. ठेकेदार कातोरे यांच्याकडे गौण खनिजाची परवानगी नव्हती. त्यांनी रॉयल्टी भरल्याचे मोघम लेखी पत्र दिले. महसूल विभागाची दिशाभूल करून खाण पट्टा आरक्षित नसताना मोघम चलन भरणा दाखविला. ५२० ब्रासच्या बनावट पावत्या कोपरगाव येथील काही लिलाव धारकांकडून घेऊन सादर केल्या. तर राजाराणी स्वाती स्टोन क्रेशर व सप्लायर्स (जामगाव, अकोले) यांच्याकडे परवाना नसताना ७२४.१८ ब्रास आर्टीफिसिअल वॉश सॅन्डची बिले कातोरे यांनी जोडल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले. बीओटी तत्वावरील संगमनेर बस स्थानक व व्यापारी संकुल बांधकामासाठी वापरण्यात आलेले गौण खनिज उत्खननाबाबत कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सिद्ध झाल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार वाळू, मुरूम, डबर, क्रश सँड प्रकरणी ३ कोटी ६६ लाख २२ हजार ८६९ रुपये दंडात्मक कारवाईचे आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी सोमवारी काढले. निकम यांनी या अगोदर ५७ स्टोन क्रेशर चालकांवर ७६५ कोटींची दंडात्मक कारवाई केली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे अमोल खताळ यांनी सर्व पुरावे सादर करत तक्रार केली होती. ठेकेदार कातोरे यांना झालेला दंड भरेपर्यंत पाठपुरवा सुरु राहणार असल्याचे खताळ यांनी सांगितले. बस स्थानक व व्यापारी संकुल, १४ फलट व आगार व्यवस्थापक निवास, १० कर्मचारी निवासस्थाने असे (५९०० चौ. मी.) कामामध्ये लागणाऱ्या वाळूला २ कोटी ३४ लाख १ हजार रुपये, मुरूम ८ लाख ४९ हजार ६५२, डबर १० लाख ४८ हजार २४४ तर क्रश सँडला १ कोटी ४३ लाख ८३ हजार ९७३ असा एकूण ३ कोटी ६६ लाख २२ हजार ८६९ रुपये दंड ठोठावल्याने खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here