सातारा;स्वामी सदानंद – बैल खूप प्रामाणिक असतो. शेवटपर्यंत तो काबाडकष्ट करतो. आपल्या मालकाशी बेईमानी करत नाही. तुमच्यासारख्या बेईमानाची तुलना बैलाशी करुन मी चूकच केली असल्याचा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी नाव न घेता विधान परिषदेचे माजी सभापती आ.रामराजे माईक निंबाळकर यांना लगावला.
आ. गोरे यांच्या विधानावर रामराजे यांनी “मोदींनीच गोरेंना मला बैल म्हणायचा अजेंडा दिला असेल,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. रामराजेंनी दिलेल्या उत्तराबाबत आ. गोरे म्हणाले, “बैल मालकाची कधी प्रतारणा करत नाही. त्यांच्यासारख्या बेईमानाची तुलना बैलाशी करुन मी चूकच केली आहे.’
त्यांनी सातारा जिल्ह्याशी कायम बेईमानी केली आहे. त्यांनी आपला जिल्हा बारामतीला गहाण टाकून इथल्या जनतेशी बेईमानी केली. मंत्री असताना माण, खटाव, फलटणसह इतर पाणीयोजना रखडवून आपल्या हक्काचे पाणी बारामती, सांगलीला देण्यात त्यांनी धन्यता मानली. दुष्काळी जनतेशी इतकी मोठी बेईमानी आजपर्यंत कुणीच केली नाही. रयत शिक्षण संस्थेत कशी आणि किती बेईमानी चाललीय हे सर्वांनाच दिसतेय. जिल्हा बॅंकेत बसून तुम्ही अनेकांच्या खोड्या काढता. तिथेच बसून तुम्ही अनेकांच्या विरोधात षडयंत्रे रचता.
जिल्ह्यातील कुणाला आणि कसे अडचणीत अडकवायचे हे तुमच्याशिवाय कुणालाच जमणार नाही, अशी टीका गोरे यांनी केला. मोदी यांनी मला काय सांगितले, याची काळजी त्यांनी करु नये. मोदींच्या आशीर्वादासाठी तुम्ही किती आतुर आहात हे आम्हाला चांगले माहित आहे. ज्या राष्ट्रवादीने तुम्हाला इतका सन्मान आणि पदे दिली त्या राष्ट्रवादीला आणि पवारांना सोडून तुम्ही इकडे तिकडे हालचाली करता, यातच तुमची इमानदारी दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.