कोपरगाव मालेगाव रस्त्याची दुर्दशा ; सामाजिक कार्यकर्ते संजय काळे करणार ढोलबजाव सत्याग्रह !

0

कोपरगाव : कोपरगाव मालेगाव रस्त्याची कोपरगाव तालुका हद्दीमध्ये अत्यंत दुर्दशा झाली असून सार्वजनिक बांधकाम खाते आणि रस्त्याच्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून त्या निषेधार्थ आणि रस्ता दुरुस्ती करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी *:- “ढोल बजाव आंदोलन”सत्याग्रह करण्याचा इशारा सहाय्यक अभियंता श्रेणी-१ सार्वजनिक बांधकाम उपविभाग-१,येवला, जि. नाशिक यांना पत्रकाद्वारे दिला आहे.
आपल्या पत्रकात काळे यांनी म्हटले आहे की कोपरगाव ले मालेगाव राज्य महामार्गाचे काम बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर करण्यात आले. कोपरगाव ते येवला रस्त्याचे अंतर आपल्या कार्यालयाचे अखत्यारित येते.
सदर ठेकेदाराने येवला तालुक्यातील पिंपळगाव जवळ टोल नाका लावून गेली १५ ते १७ वर्षा पासून टोल वसूली करत आहे. परंतु रस्त्याचा टोल वसुली पासून कोपरगाव शहर हद्दीतील येवला नाका ते टाकळी फाटा रस्त्याची कायम दुरावस्था असते.
या रस्त्याला कायम खड्डे पडतात मात्र तात्पूर्ती डागडूजी करून वेळ मारून नेली जाते. प्रत्यक्षात ह्या अंतरात रस्त्यावर वाहन चालवणे ही सर्कस आहे. हया अंतरात ठेकेदाराने रस्त्याचे काम निविदे प्रमाणे कधीच केलेले नाही. सदर रस्त्याला रस्त्याचे नियमा प्रमाणे कधीच साईड पट्ट्या देखील बनवल्या नाही.
कोपरगाव शहर हद्दीत अपघात झाला की आमचे तालुक्याचे पगारी व पेन्शनर लोकप्रतिनिधी तात्पूर्ते आवाज उठवतात परंतु नंतर काय मांडवली होते कळत नाही. कोपरगाव शहर हद्‌दीत रस्त्याचे काम ठेकेदार गुणवत्तेत करीत नाही. कोपरगाव शहर हद्‌दीत येवला नाका ते टाकळी फाटा रस्त्याचे गुणवत्तेत मजबूतीकरण, डांबरी करण, साईड पट्ट्या व साईड गटार ही कामे तात्काळ पुर्ण करून द्यावी. यामागणीसाठी मी “ढोल बजाव सत्याग्रह ” करणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील रस्त्याचे अंतर आपले येवले तालुक्यातील कार्यालयाचे अखत्यारित असल्यामुळे आपले कार्यालय व ठेकेदार कोपरगाव तालुक्यातील, कोपरगाव शहरातील अंतराला सापत्न वागणूक देत आहात.असा आरोप काळे यांनी केला आहे. पुढे म्हटले आहे की कोपरगाव तालुक्यातील आमदार, खासदारांना देखील आपण मोजत नाही असे वाटते किंवा आपणास आमच्या तालुक्याचे घेणे देणे नाही. परंतु मी कोपरगाव तालुक्याचा नागरीक असल्यामुळे, कोपरगाव तालुक्यातच “ढोल बजाव सत्याग्रह करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here