भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा गेल्या महिन्यात अपघात झाला होता. 30 डिसेंबर रोजी सकाळी दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या घरी जात असताना त्याची कार उलटली.
तेव्हापासून पंत रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर प्रथम रुरकी आणि नंतर डेहराडून येथे उपचार करण्यात आले. यानंतर बीसीसीआयने त्यांना एअरलिफ्ट करून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले आणि पंतची शस्त्रक्रियाही तिथेच झाली. या अपघातानंतर पहिल्यांदाच त्याने ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे.
या अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंतने ट्वीट करत क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले. तसेच त्याने दोन तरुणांचा खास उल्लेख करत आभार मानले आहेत.
संबंधित तरुणांचे फोटो शेअर करत “मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीन” असं पंतने लिहिलं आहे. संबंधित दोन तरुणांनी अपघाग्रस्त ऋषभ पंतची मोलाची मदत केली होती. रजत कुमार आणि निशू कुमार अशी या दोन तरुणांची नावं आहेत.
त्याने म्हटलं, “सर्वांनी दिलेला पाठिंबा आणि शुभेच्छांसाठी मी नम्र आणि कृतज्ञ आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना मला आनंद होत आहे. रिकव्हरीचा मार्ग सुरू झाला आहे आणि मी पुढील आव्हानांसाठी तयार आहे. बीसीसीआय आणि जय शाह व सरकारी यंत्रणांचे आभार.”