कोळपेवाडी वार्ताहर :- आंदोलन करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे मात्र या आंदोलनात संजीवनीवर रोज चकरा मारणारे आणि संजीवनीचे पाकीट घेणारे भाषण करीत आहे. त्यांच्या भाषणाने करवाढीचा प्रश्न सुटणार नाही असा भाजपाच्या देखावा आंदोलनाला महाविकास आघाडीचे शिवसेना नेते भरत मोरे यांनी चिमटा काढला आहे.
कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव शहरातील मालमत्ता धारकांना खाजगी कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने सर्व्हे करून अवास्तव मालमत्ता कर लावला आहे. त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येताच आ. आशुतोष काळे यांनी स्वत: लक्ष घालून नागरिकांच्या मालमत्तांचा झालेला चुकीचा सर्व्हे पुन्हा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याबाबत योग्य ती कार्यवाही व पाठपुरावा कोपरगाव नगरपरिषदेकडून सुरु असून आ.आशुतोष काळे यांनी घेतलेल्या योग्य भूमिकेमुळे करवाढीचा प्रश्न सुटणार आहे व याचे श्रेय आपल्याला मिळणार नाही हे संजीवनीचे पाकीट घेणाऱ्यांना आणि त्यांच्या अर्धवट नेत्याला चांगले ठावूक आहे त्यामुळे त्यांनी जरी आंदोलन सुरु केले असले तरी हि कोपरगावकरांच्या डोळ्यात चक्क धूळफेक आहे.
पाच वर्षापूर्वीचे कोपरगाव आणि आत्ताचे कोपरगाव यातील फरक कोपरगाव करांना दिसत आहे. मात्र ज्यांच्या डोळ्यावर राजकारणाची पट्टी बांधली आहे त्यांना हा विकास दिसत नाही. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून मार्गी लागला आहे सुरु असलेले काम पाहता येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होवून शहरवासियांना नियमित मुबलक पाणी मिळणार आहे. शहरातील रस्ते सुधारले आहेत, शहरविकासासाठी मोठ्या प्रमाणात आ. आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी दिला आहे. कोपरगाव शहराचा मुख्य पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे आपली पिपाणी बंद पडते की काय? अशी काहींच्या मनात पाल चुकचुकत आहे.
कोपरगाव नगरपरिषदेने अवास्तव मालमत्ता कर आकारण्याबाबत झालेल्या चुका मान्य करून चुका सुधारून मालमत्ता कर कमी करण्याबाबत आ. आशुतोष काळे यांच्या बैठकीत जाहीरपणे सांगितले देखील आहे. बेसमेंट व गॅलरीजला देखील मालमत्ता कर लावला होता त्याबाबत या बैठकीला मी उपस्थित असतांना हवेवर देखील कर आकारणार का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी हा कर कमी करण्यात यावा असे आदेश मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिले होते त्यामुळे बेसमेंट व गॅलरीजला कर लावणार नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी त्या बैठकीत सांगितले आहे. आ. आशुतोष काळेंच्या खंबीर भूमिकेमुळे करवाढीचा प्रश्न सुटणार असला तरी त्याबाबत आपली कुठतरी चमकोगिरी दिसावी यासाठी हा आंदोलनाचा आटापिटा सुरु असून या आंदोलनात संजीवनीवर रोज चकरा मारणारे आणि संजीवनीचे पाकीट घेणारे भाषण करीत आहे.त्यांच्या भाषणाने मनोरंजन होईल प्रश्न सुटणार नाही. हा कर वाढीचा प्रश्न आ. आशुतोष काळेच सोडविणार आहे असे भरत मोरे यांनी शेवटी म्हटले आहे.