राष्ट्रीय हरित सेनेतर्फे कृषि विद्यापीठ परिसरात पक्षी गणना

0

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे 

       सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयातील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे कृषि विद्यापीठ परिसरात पक्षी गणना करण्यात आली. संस्थेचे सचिव डॉ महानंद माने यांच्या प्रेरणेने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये पक्षी गणना हा उपक्रम  सलग ९ व्या वर्षी ५ किलोमीटर चौरस परिसरात ३२ विदयार्थीनी ४७ विदयार्थी व ५ अध्यापक अशा ८४ पक्षी प्रेमींनी १२ गटातून ही गणना केली.पक्षी गणनेत या वर्षी ३हजार१५८ पक्षी आढळून आले. यासाठी विदयापीठातील १२ ठिकाणांची निवड करण्यात आली.विशेष म्हणजे मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षी खंडया पक्षांची संख्या वाढलेली दिसली. अनेकांनी मोरांचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये टिपले.

      दरवर्षी जानेवारी महिन्यात ही गणना त्याच ठिकाणी करण्यात येते. विदयार्थ्यांना निसर्ग पक्षी प्राणी यांची जवळीक निर्माण व्हावी या हेतुने पक्षी गणना मोहीम राबविली जाते. महात्मा फुले कृषि विदयापीठातील शालेय परिसर, धरमाडी टेकडी, शेडगे वस्ती, धन्वंतरी विभाग, सडे रोड, उदयान विदया विभाग, पाट पूर्व व पाट पश्चिम इत्यादी बारा ठिकाणी हरित सेनेच्या गटागटाने हे काम उत्साहात केले. तत्पुर्वी प्रत्येक गटप्रमुखाकडे महाराष्ट्रात आठळणा-या पक्षांचे नावे व फोटो असलेला कागद व नावांचा चार्ट देण्यात आला होता. तसेच मोबाईलमध्ये महाराष्ट्रात आढळणा-या पक्षांचे फोटो महितीसह विदयार्थ्यांना देण्यात आली. 

     हातात पॅड, पेन्सिल, पक्षांचे फोटो घेऊन भल्या सकाळी निसर्गाच्या सान्निध्यात सर्व टिमने आनंदात कार्य पार पाडले. पक्षांची आगळीवेगळी दुनिया पाहून मुले मुली भारवून गेली. सर्वांचे आकर्षण होते. अहमदनगर जिल्हयाचा मानकरी ठरलेला खंड्या पक्षी. मुळा कालव्याच्या दोन्ही घडीला बसून हा सकाळी आपले भक्ष शोधतांना अनेकांना दिसला. 

विदयापीठ परिसरातील फळबागा, पाणी व शिकारीला बंदी यामुळे कृषि विदयापीठ हे पक्षांकरिता पक्षी अभयारण्य ठरतं आहे. बगळे, कावळे, चिमण्या, कोतवाल, चिरक, बुलबुल, भारव्दाज, पोपट, साळुंकी , तुतवार, इत्यादी पक्षी गुण्यागोविंदाने येथे वास्तव्यास आहे. धरमाडी टेकडी परिसर हा पोपट, मोर, कोतवाल, बुलबुल यांचे आश्रयस्थान आहे. शालेय परिसरात कडूलिंबाची झाडे, पाणी आणि विदयार्थ्यांच्या दुपारच्या जेवणानंतर पक्षांना मिळणारे भोजन ही पक्षांना मेजवानीच असते परिणामी येथेही चिमणी, साळुंकी, कावळे यांचा निवास जास्त दिसला. या वर्षी झालेला पाऊस, आलेली रब्बी पिके यामुळे पक्षांच्या संख्येत वाढ होत आहे.

      पक्षी गणनेच्या मोहिमेत गट प्रमुख म्हणून आर्वी कडूस, आदिती घोगाणे, अनुष्का कोळसे, ऋचा रिवुड, अक्षदा ताकटे, नवनाथ पवार, पार्थ कराळे, सत्यम विरकर, समर्थ हरिश्चंद्रे सोहम वैदय, ओम धनवडे, चैतन्य लांबे, प्रतिक ढोकणे, ईश्वरी तोडमल, साक्षी गुंड, रोहीत आवारी, अनुज कालिया या विदयार्थ्यांनी काम केले तर या गटांची जबाबदारी संतोष जाधव सर , अजिक्यं भिंगारदे सर अजिंक्य सर ,अविनाश यादव सर, तुकाराम जाधव सर  माजी कलाशिक्षक प्रकाश साबळे यांनी सांभाळली. नियोजन हरित सेनेचे सचिव विदयालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी केले. मुख्याध्यापिका आशा धनवटे, उपमुख्याध्यापक अरुण तुपविहिरे प्राथमिक विदयालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री यांनी विशेष सहकार्य केले .

      संस्थचे अध्यक्ष कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील,सभापती प्रमोद रसाळ, सचिव महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, संचालक  वंजारी साहेब यांनी विदयार्थ्यांचे कौतुक केले.

—–

गणनेतील वैशिष्टये

* २०२३ मध्ये विदयापठ परिसरात आढळले ३हजार १५८ पक्षी 

* मागील वर्षापेक्षा ४५० पक्षी जादा .

मात्र पक्षी भारद्वाजची संख्या २० घटून .यावर्षी  ३० पक्षी आढळले. 

* मोरांच्या संख्येत मागील वर्षाच्या संख्येत १२ ने वाढ होऊन ५५ मोर आढळले.

*चिमणी, कावळा, कोकिळ, पोपट, घार, तुतवार, साळुंकी, बुलबुल इ. वाढ संख्येत वाढ

*अहमदनगर जिल्हयाचा देखणा पक्षी खंडयाच्या (किंगफिशर) संख्येत १३ ने वाढ होवून २९ झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here