कडेगांव दि.18(प्रतिनिधी) आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर येथे विवेकानंद जयंती सप्ताह निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन संपन्न झाले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त ठरणा-या ग्रंथांचे प्रदर्शन ग्रंथालयामार्फत भरवण्यात आले. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असे शंभरहून अधिक ग्रंथ या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कडेगांव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. डी .गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गोसावी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि त्यांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूराव पवार यांनी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्रथम वर्षापासूनच स्पर्धा परीक्षांसाठी कसून तयारी करावी आणि आपले ध्येय साध्य करावे यासाठी कठोर परिश्रम आणि अथक अभ्यासाची जोड दिल्यास यश हमखास मिळते असे सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल नीलिमा थोरात यांनी केले. यासाठी महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.