भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप

0

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटू जंतरमंतर मैदानावर आज (18 जानेवारी) धरणे आंदोलनास बसल्या होत्या. यावेळी महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

कुस्तीपटू विनेश फोगाटने पत्रकारांशी बोलताना म्हटलं, “प्रशिक्षक महिलांना त्रास देत आहेत. महासंघाचे काही आवडीचे प्रशिक्षक तर महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंना त्रास देता. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे.”

फोगाट पुढे म्हणाली, “ते आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि त्रास देतात. ते आमचं शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिक खेळण्यासाठी जातो त्यावेळी आमच्याकडे ना फिजिओ असतो ना प्रशिक्षक. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्यांनी आम्हाला धमकावणं सुरू केलं.

विनेश फोगाट ही 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील 53 किलो वजनी गटातील सुवर्ण पदकविजेता आहे.

विनेश फोगाट पुढे म्हणाली, “माझा इतका मानसिक छळ करण्यात आला आहे की मी एके काळी आत्महत्या करण्याचा विचार करत होते. दररोज माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. प्रत्येक खेळाडूला आमच्यासोबत काय घडत आहे, याची कल्पना आहे.”

“मला काही झालं, तर माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं, याची जबाबदारी कुणी घेतली असती? आपल्या कोणत्याही खेळाडूला काही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी कुस्ती महासंघाची असेल. आमचा इतका मानसिक छळ होतो. वरून मला म्हटलं जातं की मीच मानसिकरित्या कमकुवत आहे.” यादरम्यान विनेश फोगाटच्या डोळ्यात अश्रूही तरळल्याचं दिसून आलं.

कुस्तीपटूंनी पुकारलेल्या धरणे आंदोलनात अनेक दिग्गज खेळाडू उतरल्याचं दिसून येत आहे.

दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिकसह इतर अनेक खेळाडू ठाण मांडून बसले आहेत.

कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, “कुस्ती महासंघामध्ये बदल व्हावा, अशी आमची मागणी आहे. या लोकांना कुस्ती खेळाबाबत काहीएक माहिती नाही.”

बृजभूषण सिंह यांचं स्पष्टीकरण

महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी तत्काळ समोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

बृजभूषण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून असं काही घडलं असल्यास मी स्वतः फाशी घेईन, असं ते म्हणाले.

ANI वृत्तसंस्थेशी बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले, “दिल्लीत कुस्तीपटूंनी महासंघाविरुद्ध धरणे आंदोलन पुकारल्याची माहिती मिळताच मी तत्काळ आलो. माझ्यावर सगळ्यात मोठा आरोप विनेशने लावला आहे. महासंघाच्या अध्यक्षांनी या खेळाडूचं शोषण झालं, असं म्हणणारा कुणी खेळाडू समोर आला आहे का?”ते पुढे म्हणाले, “लैंगिक शोषणाचा कोणताही प्रकार झालेला नाही. तसं काही घडलं असल्यास मी स्वतःला फाशी लावून घेईन.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here