‘धनुष्यबाण’ कुणाकडे? ठाकरे की शिंदे ! आज होऊ शकतो निर्णय

0

 शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला? या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीची दुसरी फेरी मंगळवारी झाली होती. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूट पडलीच नसल्याचा दावा करत सध्या दाखवण्यात येणारे चित्र कपोलकल्पित असल्याचा दावा केला. शिंदे गटाने दिलेली शपथपत्रे खोटी असून या सर्वांची ओळखपरेड घ्या, तरच सत्यता समोर येईल, असेही आयोगाला सांगितले. शिंदे गटातील 7 जिल्हाप्रमुखांच्या शपथपत्रावरही आक्षेप नोंदवला. यात विजय चौगुले, राजाभाई केणी, चंद्रकांत रघुवंशी, किरसिंग वसावे, नितीन मते यांच्यासह आणखी दोघांचा समावेश आहे. इतर पदांवर कार्यरत असतानाही या नेत्यांना जिल्हाप्रमुखपदी दाखवण्यात आल्याचे सिब्बल यांनी सांगितले.  10 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीत शिंदे गटाचे अॅड. महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपदच बेकायदा आहे. आमच्याकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्याने शिंदेंचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. हा दावा खोडून काढताना अॅड. सिब्बल म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा पक्षच खरी शिवसेना आहे. शिंदे गटाचे आमदार, नेते काही लोकांना बाहेर घेऊन स्वत:हून बाहेर पडले आहेत. ते बेकायदा आहेत. त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम झालेला नाही. यातील काही आमदारांवर अपात्रतेचा खटला सुरू आहे. दरम्यान, आज पुन्हा यावर सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here