189 कैदी तुरुंगातून सुटणार; केंद्र सरकारच्या निकषानुसार राज्याचा निर्णय

0

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तुरुंगातील चांगली वर्तणूक असलेल्या, तसंच काही निकषांमध्ये येणाऱ्या कैद्यांच्या शिक्षेत विशेष माफी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारच्या निकषानुसार राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 189 कैद्यांची तुरुंग प्रशासनाने निवड केली आहे. प्रजासत्ताक दिनी या कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येणार आहे.

सोडण्यात येणाऱ्या कैद्यांमध्ये कुणाचा समावेश करावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने काही निकष तयार करण्यात आले आहेत. शिक्षेच्या कालावधीपैकी 50 टक्क्यांहून अधिक कालावधी पूर्ण केलेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिला कैदी, शिक्षेच्या कालावधीपैकी 50 टक्क्यांहून अधिक कालावधी पूर्ण केलेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे तृतीयपंथी कैदी, 50 टक्क्यांपेक्षा शिक्षेचा कालावधी पूर्ण केलेले 60 वर्षांवरील पुरुष कैदी, 70 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेले आणि शिक्षेचा निम्मा कालावधी पूर्ण केलेले कैदी, गंभीर आजाराने ग्रस्त, शिक्षेचा 66 टक्यांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण केलेले कैदी यांचा समावेश विशेष माफीसाठी करण्यात यावा, असे निकष केंद्र सरकारने निश्चित केले होते.

शिक्षा पूर्ण केली आहे, मात्र दंडाची रक्कम भरता येत नसल्याने तुरुंगात आहेत, तसेच 18 ते 21 वयोगटातील कैदी जे अपघाताने गुन्ह्यात अडकले असून, त्यांनी पुन्हा गुन्हा केला नाही अशांनाही विशेष माफीसाठी ग्राह्य धरण्यात यावे, असे केंद्र सरकारने सूचित केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here