उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )गेली अनेक वर्षे उरण तालुक्यातील श्री.जीवनमुक्त स्वामी महाराज चौक उरण चारफाटा येथे लवकरच ब्युटीस्पॉट तयार होण्याच्या प्रतिक्षेत असतांना त्या ठिकाणी जनतेचा भ्रमनिरास करीत सिडकोने चौकाच्या मध्यभागी ब्युटीस्पॉट ऐवजी या चौकात चक्क लहानसा सर्कल उभारुन लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी हायस्मार्ट दिवे उभे लावण्यात आले असून गेल्या महिनाभरापासून हे हायस्मार्ट दिवे बंद असल्याने हा ठेका अर्थप्रयोजना साठी काढण्यात आला होता की काय ? असा सवाल उरणच्या जनतेला पडला असून अधिकारी आणि या कामाचे ठेकेदार मिले सूर हमारा तुम्हारा हेच गाणे गुणगुंणताना दिसत आहेत.
तसा या सर्कल मधील दिवा ही अगदी ताठ मानेने उभा आहे.सदरच्या श्री.जीवनमुक्त स्वामी महाराज चौक उरण चारफाटा ब्युटीस्पॉट तर तयार झालेला नसला तरी उरणची जनता इतकी समंजस आहे दुधाची तहान ताकावर भागविणारी आहे. चौकात हायमॉस्टदिवा लागला म्हणून समाधानी आहेत.तशी ही जागा सिडकोच्या अखत्यारी मधील असून द्रोणागिरी नोडच्या सेक्टर-43 मध्ये आहे. त्यामुळे हे हायस्मार्ट दिवे सिडकोने लाखो रुपये खर्च करून उभे केले आहेत.दिवे उभे करतांना सिडकोच्या अधिकाऱ्यांनी म्हैशीच्या आधी किटलीची तयारी करून हा दिवा उभा केला असल्याने गेल्या दीड महिन्या पासून या दिव्या खाली अंधारच अंधार पसरला आहे. त्यामुळे दिव्याखाली अंधार या म्हणीची प्रचिती उरणच्या जनतेला आली आहे. लवकरात लवकर दिवे सुरु करण्यात यावे अशी मागणी जनतेतून करण्यात आली आहे.
उरण द्रोणागिरीचे कार्यकारी अभियंता एम.एम. मुंडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हा विभाग सिडकोच्या अखत्यारी मधील असून द्रोणागिरी सेक्टर-43 मध्ये येत आहे. या ठिकाणी अजूनही सिडकोकडून विद्युत पुरवठा करण्यात आलेला नाही.त्यामुळे हे दिवे हायस्मार्ट केवळ तात्पुरत्या स्वरुपात टेस्टिंग करण्यासाठी सुरु केले होते.या दिव्याना वीजपुरवठा कोणी करायचा हा प्रश्न आज तरी अनुउत्तरीत आहे. दिव्याला वीज पुरवठा करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांबरोबर बोलणी केली.त्याच प्रमाणे ओएनजीसी प्रशासना बरोबर बोलणी केली आहे. ओएनजीसीकडून त्याच्या स्ट्रीट लाईटसाठी विजेची जोडणी आलेली आहे.लवकरच ओएनजीसी प्रशासन स्थानिक ग्रामपंचायत आणि सिडको याची संयुक्त बैठकीत हा निर्णय होणार आहे. व या चौकांतील दिवाही लवकरच प्रकाशमान होईल असे अभियंता एम एम मुंडे यांनी स्पष्ट केले.