वनविभागाच्या दुर्लक्षामुळे प्राणीमित्र संतप्त
सातारा / प्रतिनिधी :
कर्तव्य बजावण्यात ‘अकुशल’ ठरलेल्या सातारा तालुक्यातील वनपाल व वनरक्षक यांच्यावर वर्ष उलटले तरी कोणतीही खातेनिहाय कारवाई झाली नसून प्राणी मित्रांनी उपचार करून दिलेल्या वानराचा भटक्या कुत्र्यांनी पडश्या पाडला होता तसेच वन हद्दीतून पवनचक्की केबलसाठी जमीन खुदाई कारणीभूत ठरलेल्या वनरक्षकाला चक्क उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कर्तव्यपालनात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वन खाते का पाठीशी घालत आहे ? असा सवाल करीत प्राणीमित्र संघटना व जागृत नागरिक थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नियुक्त कर्तव्य पालन करताना बरेचसे वन कर्मचारी व अधिकारीसुद्धा मनमानी करतात असा नागरिकांचा अनुभव आहे. चुकीची कामे करणाऱ्या काही वन कर्मचारी व अधिकाऱ्यांना वरिष्ठ पाठीशी घालतात असाही अनेक जागृत नागरिकांचा आरोप असतो. यापूर्वी ऐन लॉकडाउनच्या काळात ठोसेघर मालदेव ता. सातारा येथील वन हद्दीत ईनलूम पवनऊर्जा कंपनीच्या वीज वाहून नेणाऱ्या केबलसाठी तत्कालीन वनरक्षक राज मोसलगी यांनी सांगली आरटीओ कार्यालयातील श्री. पोटे यांच्या कंपनीसाठी संवेदनशील ठोसेघर नजीकच्या परिसरातील वनविभागाच्या हद्दीत खुदाईचे बेकायदा कृत्य केल्याची माहिती असूनही आर्थिक देवाण-घेवाण झाल्यामुळे ही माहिती लपवण्यात आली होती फिरत्या पथकाने तक्रार दाखल करूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. याउलट गेल्या आठवड्यात उत्कृष्ट वन कर्मचारी म्हणून त्यांना वनविभागातर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. तसेच संबंधिताची एवढी पाठराखण कशासाठी? असा प्रश्न जाणकार नागरिकांतून विचारला जात आहे.
दरम्यान दि. 24 मार्च 2021 रोजी सातारा शहरातील दगडी शाळा परिसरात जखमी झालेल्या एका वानराबाबतची माहिती कळवूनही कोणी वन कर्मचारी घटनास्थळी न आल्याने काही प्राणीमित्रांनी बाहेरील तज्ञांकडून ऑनलाईन माहिती घेऊन त्याच्यावर खाजगीत उपचार केले, व त्यास वनपाल कुशल झिंगा पावरा यांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र श्री. पावरा यांनी कोणतीही दक्षता न घेतल्याने तसेच योग्य त्या संरक्षणात न ठेवल्याने संबंधित वानरावर काही भटक्या - मोकाट कुत्र्यांनी वनविभागाच्या आवारातच हल्ला केला व त्याचा फडशा पडला. त्याबाबतची छायाचित्रेही पत्रकारांकडे उपलब्ध आहेत. मुळातच वन विभागाच्या ताब्यात असताना वानरासारख्या प्राण्यावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला होऊन त्यात त्याचे प्राण जाणे ही बाब खूपच गंभीर आणि अक्षम्य आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या वनपाल कुशल पावरा यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, म्हणून गेल्या दीड वर्षांपासून पर्यावरणप्रेमी व प्राणीमित्रांतून मागणी होत आहे. मात्र त्यांच्यावरही काही कारवाई झालेली नाही. वनपाल श्री. पावरा हे विविध प्रकरणांतील वादग्रस्त वन अधिकारी आहेत, मात्र वरिष्ठांशी असलेल्या लागेबांध्यामुळे त्यांच्यावरही कोणतीच कारवाई होत नाही, असा खात्याअंतर्गत व खातेबाह्य व्यक्तींचा आरोप आहे. मुळातच जखमी वानरावर उपचार करण्यात कुचराई दाखवणे आणि प्राणीमित्रांनी उपचार करून ताब्यात दिलेल्या वानराची योग्य ती काळजी न घेता, त्यास संरक्षण देण्यात कुचकामी ठरण्यामध्ये वनविभागाचे नेमके काय प्रयोजन आहे? याचा खुलासा होणे गरजेचे आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात नुकत्याच एका महिला वनपालाबाबतही काही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उद्दाम वर्तन केले होते तसेच त्या महिला अधिकाऱ्यास जिने हराम केले होते. ही घटनाही ताजी असतानाच श्री. पावरा व श्री. मोसलगी यांच्याप्रमाणेच गैरकृत्यात अडकलेल्या अन्य काही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ का सांभाळून घेतात? असा सवाल पर्यावरणप्रेमीतून विचारला जात आहे.
*सोयीस्कररित्या प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न*
महिला वनरक्षकाच्या तक्रार अर्ज प्रकरणात श्री. पावरा, श्री. मोसलगी, श्री. सोनावले यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असताना ते प्रकरण सोयीस्करपणे गुंडाळण्यात अधिकाऱ्यांनी धन्यता मानली आहे. महेश सोनावले हा मागील खंडणीप्रकरणात निलंबित झालेला असतानाही पुन्हा त्याला सातारा वनपरिक्षेत्रातील मुख्यालयाच्या ठिकाणी वनरक्षक पदावर नियुक्ती देण्यामागे काय हेतू आहे याचे गुपित उलगडत नाही. तो वनक्षेत्रपालांच्या जास्तच मर्जीतील आहे किंवा कसे याचा उलगडा होणे गरजेचे आहे
*ठोस कारवाईची प्रतीक्षा*
गतसप्ताहात वन खात्याचे पाच जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी श्री. रामानुजन सातारा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांनी या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली असता, कोणत्याही दोषी कर्मचाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, त्यांचा कोणताही मुलाहिजा न बाळगता त्याच्यावर कारवाई होणारच, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले होते, मात्र अद्याप पंधरा दिवस उलटूनही काहीच ठोस कार्यवाही न झाल्याने याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेण्याचा निर्धार प्राणीमित्रांनी व्यक्त केला आहे