नातेपुते :- विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत व बाबाराजे देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्षा सौ. उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांच्यासह व नगरसेवक मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या उपस्थितीत 17 कोटी 50 लाख रुपयाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमावर विरोधी गटातील सात नगरसेवकांनी बहिष्कार घालून कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे.
नगरपंचायतीची कार्यकारणी अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी गटाकडून विरोधक म्हणून आम्हाला कुठल्याही कामासंदर्भात विश्वासात घेतले जात नाही. मासिक मिटिंगमध्ये सर्व नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांसाठी शासनाकडून मिळणारा निधी हा ठराविक व सत्ताधारी यांच्या प्रभागासाठीच वापरण्यात येतो, विरोधी गटाचे नगरसेवकांचे कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. नगरपंचायतीच्या झालेल्या मिटींगची ठराव प्रत व बजेट प्रत वेळोवेळी मागणी करून देखील न देण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. जिल्हा नियोजन निधी वाटप करताना विरोधी गटाला पुसटशी कल्पना न देता सत्ताधाऱ्यांची प्रभागांमध्येच त्याचे वाटप केले जाते. विकासकामांची टेंडर प्रक्रिया राबवीत असताना शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करून ज्या कामांची टेंडर प्रक्रिया ऑनलाईन राबविणे आवश्यक असताना ती जाणीवपूर्वक ऑफलाइन पद्धतीने कामाच्या निधीचे तुकडे करून त्यामध्ये भ्रष्टाचाराला वाव राहील, अशा पद्धतीने राबवली जात आहे. टेंडर प्रसिद्धीकरण योग्य कारणाविना ती सोयीस्कररित्या रिकॉल केली जातात व नंतर येणारे ठराविक टेंडर धारक यांना मॅनेज करून सत्ताधारी त्यांचे सोयीनुसार वाटप करताना दिसून येत आहेत.
नातेपुते येथील पत्रकार परिषदेमध्ये विरोधी गट प्रमुख नगरसेवक ॲड. भानुदास राऊत, नगरसेवक राजेंद्र उर्फ दादासाहेब उराडे, नगरसेवक दीपक आबा काळे, नगरसेविका सौ. माया उराडे, नगरसेविका सौ. शर्मिला चांगण, नगरसेविका सौ. सविता बरडकर, स्वीकृत नगरसेवक रावसाहेब पांढरे, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रवीण काळे, भाजप नातेपुते शहराध्यक्ष देविदास उर्फ भैयासाहेब चांगण, विजयकुमार उराडे, ज्ञानेश्वर (माऊली) उराडे, शशिकांत बरडकर, अमित चांगण, सतीश बरडकर, महेश सोरटे, बिट्टू काळे आदी उपस्थित होते.