उरण दि २१(विठ्ठल ममताबादे ) आशिया खंडातील सर्वात मोठे व एक नंबरचे बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्रकल्पासाठी सोनारी गावातील (सोनारी) ग्रामस्थांच्या जमिन संपादीत झाल्या आहेत. या जमिनीपैकी काही जमिनीवर जेएनपीए (जे.एन.पी.टी) विशेष आर्थिक झोन (एस. ई. झेड) साठीच्या अनेक कंपन्या उभ्या राहत असुन या संपादीत जमिनींचे जास्तीत जास्त खातेदार हे सोनारी गावातील (सोनारी) असून या कंपन्यांमध्ये होणाऱ्या नोकर भरतीत सोनारी गावातील बेरोजगार तरूण किंवा तरूणींना नोकऱ्या मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी सोनारी ग्रामसुधारणा मंडळ, सोनारी ग्रामपंचायत, सोनारी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जेएनपीए प्रशासन विरोधात साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तसे १५ दिवस जेएनपीए प्रशासनाला देण्यात आलेले आहे. १५ दिवसाच्या आत सोनारी ग्रामस्थ, सोनारी ग्रामपंचायत, सोनारी ग्रामसुधारणा मंडळ यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १६ व्या दिवशी जेएनपीए प्रशासन विरोधात साखळी उपोषण करण्यात येईल. होणाऱ्या परिणामास जेएनपीए प्रशासन जबाबदार राहिल असा आक्रमक इशारा सोनारी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष राकेश कडू यांनी जेएनपीए प्रशासनाला दिला आहे.
ग्रामपंचायत व ग्रामसुधारणा मंडळ अध्यक्ष यांनी दि. ०४.०४.२०२२ रोजी जेएनपीए प्रशासनाकडे विविध मागण्या संदर्भात विनंती अर्ज केला होता. तसेच केवळ दाखला धारक प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली जाईल या बाबत जे. एन.पी.टी. ने दि. २३.०५.२०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या नोटीसीस ग्रामपंचायत व ग्रामसुधारणा मंडळाने हरकत घेतली असून या बाबत जेएनपीए प्रशासनाला दि. ३०.०५.२०२२ रोजी विनंती अर्ज दिला गेला . तसेच जे एन पी ए प्रशासनाला दि. १३.०६.२०२२ रोजी एस.ई. झेड आणि संपादित जमिनीच्या खातेदारांची यादी पत्रासह सादरही करण्यात आली आहे.परंतु आजपर्यंत केलेल्या पत्रव्यवहाराचा जेएनपीए प्रशासनाने कोणताही विचार केला नाही.सोनारी ग्रामस्थांसोबत चर्चा न करता एस.ई.झेड. डी.पी. (वर्ल्ड फ्री ट्रेड झोन सबकॉटीनेंट) प्रकल्पातील चालु असलेल्या नोकर भरतीत सोनारी ग्रामस्थांना जाणून बुजुन डावलण्यात आले आहे.त्यामुळे सोनारी ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
जोडलेल्या शेतकऱ्यांच्या यादीप्रमाणे जर अभ्यास केला तर जे.एन. पी.टी.मध्ये असलेल्या डी.पी. वर्ल्ड फ्री ट्रेड झोन सबकॉटीनेंट साठी ६०% जमीन ही सोनारी गावातील शेतक-यांची आहे आणि त्यांचे सविस्तर खातेनिहाय लिस्ट सुद्धा प्रशासनाला माहितीसाठी देण्यात आलेली आहे.मात्र जेएनपीए प्रशासनाने जाणून बुजून सोनारी गावच्या ग्रामपंचायत, ग्रामस्थ, ग्रामसुधारणा मंडळाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. हा विषय येत्या १५ दिवसात जेएनपीए प्रशासनाकडून सोडविण्यात आला नाही तर अध्यक्ष ग्रामसुधारणा मंडळ सोनारी व ग्रामपंचायत सोनारी संपूर्ण ग्रामस्थांसहीत १६ व्या दिवशी डी.पी. वर्ल्ड या एस. ई.झेड. मध्ये चालू असलेल्या वेअरहाऊसच्या गेट समोर साखळी उपोषण करणार आहेत.रायगड जिल्हाधिकारी, उरण तहसीलदार, पोलीस आयुक्तालय, जेएनपीए प्रशासन आदी ठिकाणी याबाबत पत्रव्यवहार देखील करण्यात आले आहे.
जे.एन.पी.टी मध्ये असलेल्या डी. पी. वर्ल्ड फ्री ट्रेड झोन सबकॉटीनेंट साठी ६० % जमीन ही सोनारी गावातील शेतक-याची आहे.सोनारी ग्रामस्थांच्या नोकर भरतीचा प्रश्न १५ दिवसांत जेएनपीए प्रशासनाकडून सोडविण्यात आला नाही तर सोनारी गावाचे ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष राकेश नरेश कडू व कमिटी ग्रामस्थांसह १६ व्या दिवशी डी. पी. वर्ल्ड या एस.सी. झेड मध्ये चालू असलेल्या वेअरहाऊसच्या गेट समोर साखळी उपोषण करणार आहेत. त्यांना माझा पाठींबा असून मी व माझे ग्रामपंचायत सदस्य या उपोषणामध्ये सहभागी होणार आहोत.उपोषण बाबत जेएनपीए प्रशासना सोबत पत्रव्यवहार देखील करण्यात आले आहे.
– पूनम कडू, सरपंच, सोनारी ग्रामपंचायत.