कोळपेवाडी वार्ताहर :- समाजात काही व्यक्ती अशा असतात ज्या स्वत:साठी कमी आणि समाजासाठी जास्त जगत असतात जणू काही त्यांनी समाजासाठी स्वत:ला वाहून घेतलेले असते. अशा व्यक्तींपैकी एक व्यक्ति कर्मवीर शंकररावजी काळे साहेब होते. त्यांच्या अंतरी असलेल्या समाजाप्रती बांधिलकीतून सुरेगाव व परिसराचा विकास झाला असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले.
सुरेगाव ग्रामपंचायतीच्या ६५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून सुरेगाव व परिसरातील नागरिकांसाठी दिनांक १९ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून गुरुवार (दि.२३) रोजी कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या समाज कार्यावर डॉ. सुरेश काळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेगावच्या माजी सरपंच सौ. सुमनताई कोळपे होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी उभारलेल्या साखर कारखान्यामुळे परिसराचा विकास झाला आहे. सुरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थानी सुरेगाव ग्रामपंचायतीच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित त्यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान आयोजित केल्यामुळे त्यांच्या कार्याच्या महतीला पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे. त्यामुळे राबविण्यात आलेले कार्यक्रम कौतुकास्पद असून बिघडलेल्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण मोहीम राबविण्याची सूचना केली. त्या सूचनेला उपस्थित सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थानी होकार देवून ६५ नारळाचे वृक्ष लावणार असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते चार जिल्हा परिषद शाळांना एल. सी.डी. प्रोजेक्टर देण्यात आले.
यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या समाज कार्याला उजाळा देतांना डॉ. सुरेश काळे म्हणाले की, सहकार, शिक्षण, साहित्य, कला, धार्मिक, व सामाजिक क्षेत्रात कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचे मोठे योगदान असून असे एकही क्षेत्र नाही की, ज्या क्षेत्राला साहेबांच्या कार्याचा स्पर्श झालेला नाही. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब सर्वांना आत्मीयता वाटणारे व्यासपीठ होते. ते आयुष्यभर समाजासाठी झिजले. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी सौ. सुशीलामाई अर्थात माई खंबीरपणे उभ्या होत्या म्हणून त्यांच्या हातून एवढं मोठ सामाजिक काम घडल. त्यांची फकत राजकीय ओळख नव्हती. वडिलांचा कष्टाचा वारसा चालवून त्यांनी सहकार चळवळीला दिलेली चालना व शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांना गुरु मानून रयत शिक्षण संस्थेचे जाळे विणले. त्यामुळे कष्टकरी, गोर-गरीब शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची मोठी सोय होवू शकली. त्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणाचा वसा आणि वारसा पुढे चालविला असल्याचे डॉ. सुरेश काळे यांनी सांगितले.
यावेळी लोकनियुक्त सौ. मीराबाई कोळपे कोळगाव थडीच्या सरपंच सौ.मीनल गवळी, श्रीमती सविता जाधव, सौ. विनिता सुपनर, तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मीकराव कोळपे, शिवाजीराव वाबळे, नामदेव कोळपे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र मेहारखांब, दगु गोरे, डॉ. शरदराव पतसंस्थेचे संचालक सुदामराव वाबळे, बन्सी निकम, गणपतराव गोरे, वसंतराव वैराळ, सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिंद्र हाळनोर, अंबादास धनगर, श्रीधर कदम, मोतीराम निकम तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी सरपंच सचिन कोळपे यांनी केले. सूत्रसंचालन अरुण लोंढे यांनी केले तर आभार राजेंद्र मेहेरखांब यांनी मानले.