तरुणाईच्या जल्लोषात संगमनेरकरांनी अनुभवला आयपीएलचा थरार
संगमनेर : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री, लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित व उपक्रमशील असलेल्या संगमनेर शहरात युवकांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या नामदार चषकाच्या अटीतटीच्या सामन्यात घुलेवाडीच्या साई छत्रपती राहुल राऊत इलेव्हन संघाने आपले नाव कोरत प्रतिष्ठेचा २०२३ चा नामदार चषक पटकावला.
ग्रामीण व शहरी भागातील युवकांसाठी असलेल्या नामदार चषक २०२३ चे आयोजन राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने जाणता राजा मैदानावर करण्यात आले होते. अत्यंत भव्य दिव्य असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आयपीएलच्या धरतीवर १६ संघांनी सहभाग घेतला. थेट प्रक्षेपण, अत्याधुनिक सुविधा, षटकार चौकारांची आतिषबाजी ,विद्युत रोषणाई, भव्यदिव्य स्टेज यामुळे ही स्पर्धा खूप लोकप्रिय ठरली.अंतिम सामन्यासाठी लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात, सौ कांचनताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, उद्योगपती राजेश मालपाणी, कॅन्सरतज्ञ डॉ हसमुख जैन, के.के. थोरात, नवनाथ आरगडे, रामहरी कातोरे, डॉ निजानंद खामकर, शतानंद खामकर, निखिल कातोरे, अजय फटांगरे ,गोरख कुटे, योगेश भालेराव ,दीपक करंजकर आदी उपस्थित होते. या अंतिम सामन्यात घुलेवाडी येथील साई छत्रपती राहुल राऊत ११ या संघाने वडगाव पान येथील आयुष्य संघावर १ धावेने मात केली. घुलेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकात करताना ५८ धावा केल्या तर आयुष्य संघाला ५७ धावा करता आल्या. यामध्ये घुलेवाडीच्या अमोल दुबेने गोलंदाजी व फलंदाजीत आपले कौशल्य दाखवत मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला तर आयुष्याच्या जिग्नेश पटेलने पूर्ण स्पर्धेत १५ विकेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधले .
याप्रसंगी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, खेड्यातील युवकांमध्ये मोठी गुणवत्ता असून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची त्यांची क्षमता आहे. क्रिकेटमध्ये संगमनेरचा अजिंक्य रहाणे यांनी तालुक्याचे नाव मोठे केले असून नुकतीच आश्वी येथील पूनम खेमनर हिची सुद्धा आयपीएल संघात निवड झाली आहे. हे संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद आहे .राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या या स्पर्धेचा लौकिक राज्यात दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये अनेक खेळाडू सहभाग घेत असतात. आनंदाच्या वातावरणात संपन्न होणारी मोठी स्पर्धा असून खेळामध्ये जय पराजय होतच असतात परंतु या खेळातून सांघिक भावना वाढीस लागते. आगामी काळातही या स्पर्धेत राज्यातील मोठ-मोठे खेळाडू सहभागी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला असून या चषकाच्या आयोजनासाठी काम केलेल्या सर्व तरुणांचे आमदार थोरात यांनी कौतुक केले.राजेश मालपाणी म्हणाले की, आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे अत्यंत सांस्कृतिक व उपक्रमशील शहर असून विकासात हे शहर राज्यासाठी दिशादर्शक आहे. तरुणांना सातत्याने विविध संधी आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही ते म्हणाले. यावेळी डॉ जयश्रीताई थोरात यांनीही शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेतील प्रथम विजेता साई छत्रपती राहुल राऊत इलेव्हन घुलेवाडी या संघाला के.के. थोरात यांच्याकडून १ लाख २१ हजार रुपये रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच संघ मालकास पल्सर गाडी देण्यात आली.
तर उपविजेत्या ठरलेल्या आयुष इलेव्हन वडगाव पान या संघाला ७१ हजार रुपये रोख रक्कम व एलईडी टीव्ही डॉ निजानंद खामकर व सदानंद खामकर यांच्याकडून देण्यात आला. तृतीय क्रमांकाच्या शिरसाट स्पोर्ट्स मनोली या संघाला आर. एम. कातोरे व निखिल कातोरे यांच्याकडून ५१ हजार रुपये व चषक देण्यात आला. चतुर्थ क्रमांकाच्या जीपी योद्धा या संघाला अजय फटांगरे यांच्याकडून ३३,३३३ रुपये रोख व चषक देण्यात आला. याचबरोबर पवन धाडीवाल यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज, सुनील गुंजाळ व आर.डी. थोरात यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, अनुप अरगुडे यांच्याकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाज ,सात्विक पंडित यांच्याकडून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अनिल कांदळकर यांच्याकडून सर्वाधिक षटकार, गौरव डोंगरे यांच्याकडून उत्कृष्ट खेळाडू, हर्षल राहणे यांच्याकडून विकेट हॅट्रिक, विराज मोरे यांच्याकडून सर्वोत्कृष्ट आयडॉल, बाळासाहेब ताजने यांच्याकडून सर्वोत्कृष्ट तालुका ,मधुसूदन दायमा यांच्याकडून सर्वोत्कृष्ट संघ, राऊत मामा यांच्याकडून निर्धाव षटक हे पुरस्कार देण्यात आले. नरेंद्र पवार व अभिजीत पुंड यांनी स्पर्धेला चेंडू पुरवले. या स्पर्धेच्या सर्व सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.विद्युत रोषणाईने नटलेल्या जाणता राजा मैदानावर ढोल ताशांची व फटाक्यांची आतिषबाजी, प्रेक्षकांची उपस्थिती, तरुणाईचा जल्लोष यामुळे ही स्पर्धा अभिनव व संस्मरणीय ठरली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.