संगमनेर : बहिण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यात घडली असून या घटनेत वीस वर्षीय सख्ख्या चुलत भावाने सतरा वर्षाच्या अल्पवयीन सख्या चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहीली. त्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला असून पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी वीस वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
तालुक्यातील एका गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोलमजुरी करून एकत्र कुटुंब चालवणाऱ्या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबात ही धक्कादायक आणि तेवढीच चीड आणणारी घटना घडली आहे. वीस वर्षीय सख्या चुलत भावाने सतरा वर्षे तीन महिने वय असलेल्या आपल्या सख्ख्या अल्पवयीन चुलत बहिणीच्या अज्ञान पणाचा फायदा घेत वारंवार तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, यातून ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. मुलीचे पोट वाढल्याने आईच्या हा प्रकार लक्षात आला, त्यामुळे अल्पवयीन पीडित मुलीला लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध तालुका पोलिसांनी गुन्हा रजि.नं १४२/ २०२३ भा.द.वि कलम ३७६, ३७६(२) एफ सह बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम (पोस्को) २०१२ चे कलम ६, १०, १२ प्रमाणे दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करत आहेत.