सातारा: जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचा दुवा असणारा महसूल विभाग लाचखोरीत कायमच अव्वल राहिला आहे. मंडल अधिकारी, तलाठी यांच्या बरोबरच कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपतच्या सापळ्यात अडकले आहेत. २०२२ सालात सातारा लाचलुचपत विभागाने एकूण २० कारवाया केल्या आहेत. यापैकी सर्वांत जास्त ८ कारवाया महसूल विभागात करण्यात आल्या आहेत. वर्ग ३ चे सहा, वर्ग ४ चा एक आणि ३ खासगी इसम, असे १० लाचखोर सापळ्यात अडकले.
विभागनिहाय कारवाईची आकडेवारी: मागील वर्षांत अॅन्टी करप्शन विभागाने सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय विभागात लाचखोरांवर कारवाई केली आहे. विभागनिहाय केलेल्या कारवाईची आकडेवारी पुढीलप्रमाणे: महसूल खाते (८), वीज वितरण कंपनी (२), समाज कल्याण खाते (१), उत्पादन शुल्क विभाग (१), पोलीस खाते (२), नगरविकास खाते (१), ग्रामविकास खाते (१), जलसंपदा (१), सहकार व पणन (१), कृषी विभाग (१), कामगार उद्योग व उर्जा विभाग (१). एकूण २० कारवायांपैकी सर्वाधिक कारवाया या महसूल विभागात झाल्या आहेत.
तीन महिन्यात तीन कारवाया: नवीन वर्षात लाचलुचपत विभागाने तीन लाचखोरांना पकडले आहे. तीनपैकी एक कारवाई शिक्षण विभागात तर दोन महसूल खात्यात झाल्या आहेत. प्रतिवर्षातील आकडेवारी पाहिल्यास लाचखोरीत महसूल विभाग अव्वल असल्याचे दिसते. अॅन्टी करप्शन विभागाने एकाच दिवशी महसूल खात्यातील दोन ठिकाणी सापळे लावून लाचखोरांना पकडल्यानंतर प्रशासकीय कार्यालयांमधील सामान्यांच्या अडवणुकीचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला.
भूमी अभिलेखची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित: प्रशासनातील सर्वांत ढिसाळ कारभार असणारा विभाग म्हणजे भूमी अभिलेख कार्यालय. कार्यालयात अडलेली जनसामान्यांची कामे मागील अनेक वर्षांपासून ताटकळत पडलेली आहेत. शासकीय फी भरूनही जमिनीची मोजणी, नोंदी, नकाशांची कामे वेळेवर होत नाहीत. तातडीची, अतितातडीच्या मोजणीसाठी पैसे भरूनही लोकांच्या कामांना विलंब होत आहे. कर्मचार्यांची संख्या अपुरी असल्याचे कारण पुढे केले जात असले तरी त्यातील खरे कारण वेगळेच आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभाग देखील आता लाचलुचपत विभागाच्या रडारवर आला आहे.
महसूल कर्मचार्यांची खरडपट्टी: कराडमध्ये मंडल अधिकार्यासह खासगी मदतनिसाला सापळा रचून पकडल्यानंतर कराडच्या शासकीय विश्रामगृहात अॅन्टी करप्शनकडून संशयितांच्या अटकेची कारवाई सुरू होती. अन्य मंडल अधिकारी, तलाठी विश्रामगृहाच्या आवारात थांबले होते. यावेळी डीवायएसपी उज्ज्वल वैद्य यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी केली. पैशासाठी लोकांना छळता आणि कारवाई झाल्यावर रडारड कशाला करता? असे सवाल करत त्यांना सुधारण्याचा सल्ला दिला होता.