–कोपरगावात भाजप व मित्र पक्षांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ विशाल यात्रा
कोपरगाव : भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफीवीर संबोधून त्यांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. प्रखर राष्ट्रभक्ती व हिंदुत्वाचा विज्ञाननिष्ठ विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे समस्त भारतीयांचे दैवत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीवर शंका घेऊन त्यांचा अपमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यांचा अपमान आम्ही मुळीच सहन करणार नाही. यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात सावरकरप्रेमी जनता रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची खरी जागा दाखवून देईल, असा सज्जड इशारा भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी दिला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) च्या वतीने गुरुवारी (६ एप्रिल) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ कोपरगाव शहरातून भव्यदिव्य स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. त्यावेळी स्नेहलताताई कोल्हे बोलत होत्या. शहरातील भाजप जनसंपर्क कार्यालयापासून वाजतगाजत निघालेल्या या यात्रेत भाजप, भाजयुमो व रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी, कार्यकर्ते व सावरकरप्रेमी नागरिक ‘मी सावरकर’ असा उल्लेख असलेल्या टोप्या घालून व हातात विविध फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्नेहलताताई कोल्हे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करून त्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संपूर्ण भारतीयांचे दैवत आहेत. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य करून सावरकरांच्या प्रखर देशभक्तीचाच नव्हे तर समस्त भारतीयांचा अपमान केला आहे. राहुल गांधींचे स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचे वक्तव्य अतिशय निंदनीय व निषेधार्ह आहे. आभाळाएवढे विशाल व्यक्तिमत्त्व असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलण्याची राहुल गांधींची पात्रताच नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमच्या बोलण्याने त्यांची उंची अजिबात कमी होणार नाही. राहुल गांधी, तुम्ही मोठा अक्षम्य अपराध केला आहे, आता तरी मनाचा मोठेपणा दाखवा आणि भारतीयांची माफी मागा. राहुल गांधी असो व इतर कोणी असो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान कोणी केला तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी ठणकावून सांगितले.