कोपरगाव तालुक्यात ४३ हजारांवर शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप होणार – स्नेहलताताई कोल्हे

0

कोपरगाव : गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सुमारे १ कोटी ६३ लाख रेशनकार्डधारकांना केवळ १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल मिळणार आहे. कोपरगाव तालुक्यात ४३ हजार ५५६ शिधापत्रिकाधारकांना हा ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार असून, लाभार्थींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. 

कोपरगाव येथील येवला रोडवरील शारदानगरमधील उल्हास आधारराव पवार यांच्या स्वस्त धान्य दुकान क्र.९५ या ठिकाणी शुक्रवारी (७ एप्रिल) माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते लाभार्थींना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचा शुभारंभ झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. आता गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दारिद्र्य रेषेवरील शेतकरी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. याचा लाभ राज्यातील १ कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना होणार असून, या निर्णयाची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. कोपरगाव तालुक्यातील ४३ हजार ५५६ शिधापत्रिकाधारकांना १४ एप्रिल २०२३ पर्यंत हा ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार आहे. पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्वारे ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार आहे. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा देण्याची सुविधा प्रशासनाने केली आहे.

यावेळी शकुंतलाताई पवार, शोभाताई उल्हास पवार, बाळू पवार, जितेंद्र रणशूर, रुपालीताई शिंदे, वर्षाताई पवार, मंगलाताई गायकवाड, बेबीताई चौधरी, अर्चना ओहर, बाळासाहेब होन, उल्हास भदाणे, किरण थोरात, रोहित पाटील आदी उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबवत आहे. शिंदे-फडणवीस सरकारने अवघ्या १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाल्याचे सांगून लाभार्थी महिलांनी यावेळी सरकारचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here