सातारा : ‘समाजातील गुन्हेगारीच्या घटना रोखायच्या असतील आणि एखादा गुन्हेगार गुन्हा करत असेल तर त्याला पोलिसांनी डायरेक्ट शूट ॲट साईट करावे,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी आपल्या काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. ते पुन्हा एका त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी समाजात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत प्रतिक्रिया दिली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या डीपी जैन कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत खासदार उदयनराजे भोसले यांनी चर्चा केली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले, कायद्यात भरपूर पळवाटा आहेत. उदाहरणार्थ १६ ते १८ वयाच्या आतील गुन्हेगार मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुन्हा केल्यानंतर त्यांना रिमांडहोम तसेच बाळ सुधारगृहात ठेवले जाते. नंतर ते त्या ठिकाणाहून सुटतात. माझं तर एकच म्हणणं आहे की, एखाद्याला खलास करायचा असेल आणि त्यासाठी त्याचे जर डोके एवढं चालत असेल तर पुढे मागे बघायचे नाही डायरेक्ट शूट ॲट साईट करून टाकायचे.’
‘जोपर्यंत समाजास उदाहरण दिले जात नाही तोपर्यंत अशा घटना चालतच राहणार आहेत. गुन्हेगारी कशी थांबवणार? कशा प्रकारे अत्याचाराच्या घटना थांबविणार? डायरेक्ट कारण वकील मंडळी भरपूर आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर मी स्वतः एखादा गुन्हा केला की नंतर मी वकील देणार आणि बाकीचे जे आहेत की त्यांच्यावरती सुद्धा अत्याचार झाला आहे. त्यांच्याकडे तेवढा पैसा नसल्याने ते पोलिस ठाण्यात जातात. त्या याठिकाणी गेल्यानंतर पोलिसच त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात. त्यांनाच आतमध्ये टाकतात,’ असेही उदयनराजे भोसले म्हणाले.