सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

0

कोपरगाव दि. १४ एप्रिल

                आज साखर कारखानदारीतील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. काळानुरूप स्पर्धेला तोंड देतांना प्रत्येकाने हे बदल आत्मसात केले पाहिजे ही माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची शिकवण संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे अभ्यासू युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, व सर्व संचालक मंडळ नेटाने पुढे चालवत आहे असे प्रतिपादन डेक्कन शुगर टेक्नॉलाजीस्ट असोसिएशनचे संचालक व कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी केले.

           सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात शुक्रवारी उत्पादन विभागातील कर्मचा-यांसाठी शुन्य टक्के मिल बंद तास व बॉयलरची निगा देखभाल दुरूस्ती विषयावर महाराष्ट्र राज्य बॉयलर बोर्डाचे सदस्य, अभियांत्रिकी प्रकल्प पुणे विद्यापीठाचे परिक्षक, प्रथीतयश सल्लागार डब्ल्यु. आर. उर्फ वाल्हु रघुनाथ आहेर (मुखेड) यांचे प्रमुख उपस्थितीत एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यांत आली होती त्याचे उदघाटन करतांना ते बोलत होते. 

           प्रारंभी मुख्य अभियंता के. के. शाक्य यांनी स्वागत केले. ए. के. टेंबरे, व्ही. आर. भवार यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर विभागाचे आधुनिकीकरणात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केलेल्या बदलाविषयी माहिती दिली. 

    डब्ल्यु. आर. उर्फ वाल्हु रघुनाथ आहेर याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे साखर कारखानदारीतील भीष्म होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आधुनिकीकरणात प्रगत असलेल्या साखर कारखान्यांना अनेकवेळा भेटी देवुन तेथील तंत्रज्ञान आत्मसात करून राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ (नविदिल्ली), महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ (मुंबई), वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट (पुणे) आदि संस्थेच्या माध्यमातुन देश व राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला आधूनिकीकरणाची दिशा दिली. बॉयलर हा साखर उद्योगाचा अविभाज्य घटक असुन छोटया छोटया गोष्टींची सतत काळजी घेतली नाही तर त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. शुन्य टक्के मिल बंद तास ही उपाययोजना काळाची गरज आहे. यासाठी या विभागात काम करणा-या कामगारांनी अतिशय दक्ष राहिले पाहिजे. बॉयलरची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आधूनिक तंत्रज्ञानाचा प्रत्येकाने उपयोग करून या क्षेत्रात सभोवताली काय घडते याचा तौलनिक अभ्यास करावा. समन्वयातुन आपल्या कारखान्याची उत्पादन क्षमता वाढविण्यांवर भर द्यावा., असे सांगून त्यांनी मिल, बॉयलर, बॉयलिंग हाऊस मधील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची संगणकीयप्रणाली द्वारे सचित्र माहिती दिली. शेवटी वरिष्ठ अभियंता यु बी. शेळके यांनी आभार मानले. सहायक अभियंता आर. एम. डमाळे, ए. जी. यादव,एस. एस. गाडेकर आदि अधिकारी व कामगारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे सल्लागार डब्ल्यु. आर. आहेर यांनी निरसन केले. यावेळी एच आर मॅनेजर प्रदिप गुरव, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here