७५ वर्षांनंतर चार भिंती येथे डॉ.आंबेडकर जयंती साजरी

0

सातारा  : येथील चार भिंतीजवळ समाजमंदिरात ७५ वर्षांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. येथील जयभवानी सोसायटीचे अध्यक्ष अंकुश मोरे व ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते नारायण जावलीकर यांच्या पुढाकाराने संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आली.प्रारंभी,ज्येष्ट वयोवृद्ध भोलाराम बोरकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

                   नारायण जावलीकर प्रास्ताविकपर म्हणाले,”भीक नको,पण कुत्रे आवर…याप्रमाणे भटक्या विमुक्तामध्ये सकारात्मक पद्धतीचा अवलंब करण्यासाठी महापुरुषांचे विचारच बदल घडवून आणू शकतात. शहरातील चार भिंतीचा परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.मात्र, कड्या-कपारीत वसलेल्या वस्तीत जयंती होत नसल्याची खंत होती.बाबासाहेबांची जयंती फक्त देशातच होते असे नाही संपूर्ण जगभर होत असते.तेव्हा आपण मागे राहून कसे चालेल ? उशिरा का होईना सुरू झालेल्या जयंतीमध्ये खंड पडणार नाही. लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधन होणे काळाची गरज आहे.या समाजात सुमारे २८ जमाती या मागतकरी व भीक मागतात. याशिवाय,१४ जमाती कष्ट करतील किंवा चोऱ्या-माऱ्या करून आपली उपजिविका पूर्ण करतात.” अनिल वीर म्हणाले,”महापुरुषांनी सर्वांना भरभरून दिले आहे.तेव्हा त्याचा लाभ घेण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे.तेव्हा वस्तीतील या समाजमंदिरात मुलांनी अभ्यास करून महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत.तरच सर्व क्षेत्रात प्रगती होईल.श्रम व शिक्षणास प्राधान्य दिले पाहिजे. पारंपारिक व्यवसाय, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता,दारिद्र्य आदींना मूठमाती देऊन स्वतः व कुटुंबाचा विकास केला पाहिजे.आपसुकच समाज व राष्ट्राचा विकास होईल.” विक्रांत पवार म्हणाले, “वस्त्या-वस्त्यांमध्ये जाऊन जयंतीच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा स्तुत्य व अनोखा असा प्रयत्न आहे.” विजय निकम यांनी घरेलू योजनांची सविस्तर माहिती कथन केली.अंकुश मोरे यांनी १९९५ साली शहरातून आम्ही या वस्तीत स्थिर झालो आहे.यापुढे जयंतीसह प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेतले जातील.असेही आश्वासन त्यांनी दिले.

         अस्लम तरडसकर म्हणाले, मानवाने विचाराबरोबरच संविधान समजावून घेतले पाहिजे.पालिका सेवेच्या पाणी, वीज आदींच्या मोबदल्यात कर वसूल करतात.मात्र,स्वतःच्या घरावर कसला कर लावता ? यावर त्यांनी आक्रमक मुद्दे मांडले.

   नारायण जावलीकर यांनी प्रास्ताविकेसह स्वागत,मनोगत व सूत्रसंचालन केले.ऍड.प्रवीण जावलीकर यांनी आभारप्रदर्शन केले.

    सदरच्या कार्यक्रमास सातारा टाइम्सचे संपादक सत्यवान शेडगे, ऍड. विलास वहागावकर, अंनिसचे प्रकाश खटावकर, गणेश पाटील, लोणकर,निखिल पाटणकर, युवराज मोलकर, सचिन जावळे, अनंत मारे व शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चौकट ———

                                     शहरातील फुले शाहू आंबेडकर विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केल्याप्रमाणे शहरातील चार भिंती शेजारी कोल्हाटी – वडार या भटक्या विमुक्त जमातीच्या वस्तीमधील समाजमंदिरात पहिल्यांदाच जयंती स्वातंत्र्यानंतर होत असल्याने विविध संघटनांचे पदाधिकारी  व वस्तीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here