नागपूर ; “काँग्रेसबरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असा आरोप होतो. संघाला विचारायचं आहे की तुमचं आणि भाजपचं चाललंय काय? आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. संभाजीनगरला सभा झाली, त्यांनी गोमूत्र शिंपडलं”, “यांचं हिंदुत्व गोमूत्रधारी आहे. अशा भाषेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला . नागपूरमध्ये आयोजित महविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ते बोलत होते . ते पुढे म्हणाले,जग कुठे चाललंय, यांचं काय चाललंय. तिथेही मुसलमान आलेले, इथेही मुसलमान आलेले. मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. मी गेलो असतो तर? उत्तर प्रदेशात मदरशात जाऊन कव्वाली गाणार. जो जीव द्यायला तयार आहे तो हिंदू आहे. 2014 साली भाजपने युती तोडली होती. वचन तुम्ही मोडलंत. हे हिंदुत्व नाही”.
“सव्वाशे कोटींचा देश आहे. एका माणसाने संविधान लिहिलं. ही वज्रमूठ एका माणसाने लिहिलेल्या घटनेचं रक्षण करू शकत नाही का? घटना बचाव नेभळटपणाचं वाटतं. घटना रक्षण मीच करणार हे मी सांगू इच्छितो. डोळ्यादेखत सगळं घडतंय. हल्ली शब्द जपून वापरतो. फडतूस बोलण्यामागचा उद्देश काय होता. शेतकऱ्यांचा आक्रोश तुम्ही जाणता. उलट्या पायाचं सरकार आल्यानंतर गारपीट होते आहे. आजच्या सभेचं वेगळेपण- आम्हाला फसवलं म्हणून एकत्र आलो.
धमन्यात हिंदुत्व असतं तर गुवाहाटीला गेले नसते, अयोध्येला गेले असते
“राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात होता. थंड बस्त्यात होता. सुरुवात शिवसेनेने केली. पहले मंदिर, फिर सरकार. मोदींना सांगत होतो की तुमचं सरकार आहे. आम्हाला म्हणाले, आता काही बोलू नका. न्यायालयाने निकाल दिला. मग हे टिकोजीराव फणा काढून बसले. आम्हीच सगळं केलं म्हणून सांगत आहेत. आता कुणीही जाऊ शकतं. रामभक्त असते तर पहिले सुरतला गेले नसते, अयोध्येला गेले असते. यांच्या धमन्यात हिंदुत्व असतं तर गुवाहाटीला गेले नसते, अयोध्येला गेले असते. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस अयोध्येला गेले नाहीत. नळाबरोबर गाड्याची यात्रा. रामाच्या दर्शनाला गेल्यावर रामराज्याला विसरु नका. शेतकरी टाहो फोडत आहेत, आक्रोश करत आहेत. पंचनामा करायला सुद्धा सरकारी अधिकारी वेळेवर जात नाहीत. आम्ही कमीत कमी वेळेत शेतकऱ्याला मदत पोहोचवली होती. आता शेतकरी जे बोलत आहेत त्याचं काय. हे शेतकऱ्याच्या मयताला जातील”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत असं सांगतात. घरात बसून कारभार करत होतो पण राज्याचा देशात पाचवा क्रमांक होता. काम कुठूनही करता येतं. नुसतं फिरला म्हणजे काम होत नाही. जनतेला जे पाहिजे ते देत नाहीत. महागाई वाढत चालली आहे. एअरबस गुजरातमध्ये गेली कारण केंद्रातून सिग्नल मिळाला”.
बाप चोरणारी औलाद तुमची “शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केला. बाप चोरणारी औलाद तुमची, जनतेला मुलासारखं काय सांभाळणार? शिवसेना नाव नेलंत, धनुष्य नेलंत. चंद्रकांत पाटील बोलले. तेव्हा तुम्ही आणि तुमचे काका गेला होतात का? जे चंद्रकांत पाटील बोलले ते संघाच्या लोकांना पटतंय का? बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. मी शिवसेनाप्रमुखांचं नाव घेऊन मैदानात उतरतो. तुम्हाला तुमचा बाप निवडायचा आहे. जर मर्द असाल तर मैदानात या. मैदान मिळू नये म्हणून काड्या कशाला घालता? लोक जमलेत. जनता जनार्दन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.