आ.निलेश लंके, माजी मंत्री बबनराव घोलप, मा.आ.डॉ तांबे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
संगमनेर : पूर्वीच्या काळी अत्यंत वैभवशील असलेला राहाता तालुका विकासात मागे पडला आहे. खड्ड्यांसाठी राज्यात कुप्रसिद्ध असलेला नगर- मनमाड रस्ता इतकी वर्ष का होत नाही हे मोठे कोडे आहे. दहशत रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा पॅनल उभा असून राहाता बाजार समितीत निश्चित परिवर्तन होणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचेे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
कोल्हार येथील माधवराव खर्डे पाटील चौकात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित शेतकरी व मतदार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगर-पारनेरचे आमदार निलेश लंके, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ,रावसाहेब म्हस्के, सुधीर म्हस्के ,ॲड. पंकज लोंढे, डॉ एकनाथ गोंदकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे, सचिन कोते, काँग्रेस नेते सुरेशराव थोरात,बाळासाहेब खर्डे , सौ प्रभावतीताई घोगरे, सुहास वहाडणे, अमर कतारी, लोणी खुर्द्दचे सरपंच जनार्दन घोगरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण पा. कडू, विक्रम दंडवते, अविनाश दंडवते, उत्तमराव घोरपडे, सचिन चौगुले, लताताई डांगे आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, वंचित आघाडी यांचेसह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, पूर्वीच्या काळी राहाता तालुका हा अत्यंत विकसित व वैभवशाली होता. पेरूच्या अनेक ट्रक येथून भरून जात होत्या. मात्र वर्षानुवर्षे सत्ता असूनही गचक्यांचा रस्ता म्हणून कुप्रसिद्ध असलेला नगर मनमाड रस्ता होत नाही. याचबरोबर येथील विकास थांबलेला आहे.आम्ही लोकशाही मानणारे असून राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन जात विकासाचे राजकारण करणे ही आपली पद्धत आहे. मात्र राहाता तालुक्यात विकासाऐवजी दहशतीचे राजकारण सुरू आहे. इकडे चांगले काम करायचे नाही आणि संगमनेरला जे चांगले काम सुरू आहे. त्यामध्ये अडचणी निर्माण करायच्या असे काम काही लोक करत आहेत. मात्र आता दहशतीमधून बाहेर पडत येथील उमेदवारांनी धाडस करत निवडणुकीत उमेदवारी दाखल केली आहे. आज शेकडो लोक जमा झाले आहेत उद्या लाखो मतदान करतील असा विश्वास व्यक्त करताना यावर्षी, गोदावरी, दारणा नदीला चांगले पाणी असूनही पुणतांब्यात पाणी का पोहोचले नाही असा सवाल करताना आपण निळवंडे धरणाचे पाणी ऑक्टोबर २०२२ मध्येच दुष्काळी भागाला देणार होतो.मात्र आता हे काम का थांबले ,काय अडचणी झाल्या हेही कळायला मार्ग नाही असेही त्यांनी सांगितले. नगर पारनेरचे आमदार निलेश लंके म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना बरोबर घेत अत्यंत विकासाचे व सर्व सामान्य माणसांना न्याय देण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रातील सुसंस्कृत मंत्री म्हणून नगर जिल्ह्याला त्यांचा सार्थ अभिमान आहे.राहाता तालुक्यात परिवर्तन नक्की होणार आहे. येथे सर्वसामान्य जनता हुकूमशाहीला कंटाळली असून परिवर्तनाची सुरुवात दक्षिणेसह राहात्यातूनच होणार आहे.महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर काही मंडळी अस्वस्थ होती. अत्यंत हुकूमशाही पद्धतीने दबाव टाकून त्यांनी सरकार पाडले आहे. कष्टकरी,कामगार व व्यापारी यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीत कुणालाही न घाबरता परिवर्तनाला साथ द्या असे आवाहनही त्यांनी केले.
माजी मंत्री बबनराव घोलप म्हणाले की, विरोधी पक्षाला उमेदवार मिळू नये इतकी दहशत या तालुक्यांमध्ये आहे. मात्र सध्या महाविकास आघाडीचे उभे असलेले सर्व उमेदवार हे अभ्यासू आहे. भाजपाचे राजकारण हे कूटनीतीचे असून हुकूमशाही हटवा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रावसाहेब म्हस्के, श्रीकांत मापारी, सौ प्रभावतीताई घोगरे, सुहास बापू वहाडणे, डॉ एकनाथ गोंदकर ,बाबासाहेब कोते, नानासाहेब शेळके यांचीही भाषणे झाली. यावेळी सचिन कोते, जगन्नाथ गोरे, उत्तमराव मते, नितीन सदाफळ ,बबन नळे, विठ्ठल शेळके, सौ अनिता गोरडे ,सौ लता चव्हाण ,अण्णासाहेब वाघे, सुनील थोरात, विजय चौधरी, शरद भदे ,रमेश बनसोडे, श्रीकांत मापारी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब खर्डे यांनी केले तर उत्तमराव घोरपडे यांनी आभार मानले.
आ.थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन गोरगरिबांच्या विकासासाठी अहोरात्र काम करणारे जिल्ह्याचे सुपुत्र आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असून त्यांनी विकासातून उभा केलेला संगमनेर तालुका हा सर्वांसाठी आदर्शवत आहे. नवीन लोकप्रतिनिधींना काम करण्याची ते सातत्याने मोठी ऊर्जा देत असून चांगल्या व्यक्तीकडे पाहून राजकारण केले तर आपलेही चांगले होते असे सांगताना दक्षिणेतून परिवर्तनाची सुरुवात होणार असल्याचे सांगून आमदार निलेश लंके यांनी भाजपला इशारा दिला.
दहशती विरुद्ध हिम्मत केलेल्या उमेदवारांना किंमत द्या – सौ.घोगरेराहाता तालुक्यात एकाच कुटुंबाची सत्ता ही हुकूमशाहीकडे वाटचाल करणारी आहे. दहशतीमुळे इथला विकास थांबला असून या दहशतीच्या राजकारणातून सर्वसामान्य जनतेला सोडवण्यासाठी हिंम्मत करून उभे असलेल्या गोरगरीब कुटुंबातील या उमेदवारांना किंम्मत द्या असे भावनिक आव्हान सौ.प्रभावतीताई घोगरे यांनी केले.