सातारा : एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या उत्तरार्धात खटाव तालुक्यात झालेला वादळी पाऊस व जोरदार गारपिटीने द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरते उद्ध्वस्त झाले आहेत. देशांतर्गत तसेच स्थानिक बाजारात विकली जाणारी व परदेशात निर्यात होणार्या द्राक्षांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने बळीराजा कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. शासनस्तरावर नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी आता तालुक्यातील शेतकर्यांना लवकरात लवकर आणि भरीव मदत मिळणे गरजेचे आहे.
खटाव तालुक्याच्या दक्षिण भागातील निमसोड, कातरखटाव, डांभेवाडी, बोंबाळे, कलेढोण, शिंगाडवाडी, यलरमरवाडी या पट्ट्यात द्राक्षांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या भागातील शेतकरी लाखो रुपयांचे भांडवल घालून द्राक्षांची लागवड करतात. चालू वर्षी शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने द्राक्षबागा फुलवल्या होत्या. उन्हाळ्यात द्राक्षांचा हंगाम सुरु होताच एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या उत्तरार्धात या भागात वादळी पाऊस आणि जोरदार गारपिट झाली. मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने खटाव तालुक्यातून दरवर्षी परदेशात द्राक्षे निर्यात केली जातात. यातून शेतकर्यांना बर्यापैकी आर्थिक फायदा होतो, मात्र यावर्षी गारपिटीने निर्यातक्षम द्राक्षमणी गळून गेल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले.
एक एकर नवीन द्राक्ष बाग लावायला आठ ते नऊ लाखांचा खर्च येतो. त्यानंतर दरवर्षी औषधे, खते, मजूरीवर चार लाखांचा खर्च येतो. निसर्गाने साथ दिली आणि अपेक्षित उत्पादन निघाले तर एकरी आठ ते दहा लाखांचे उत्पन्न घेता येते. निमसोड, डांभेवाडी बोंबाळे, कलेढोण, शिंगाडवाडी, यलमरवाडी पट्ट्यातील शेतकर्यांनी द्राक्षबागांमध्ये कोट्यवधींचे भांडवल गुंतवले होते. गारपिटीने हे सर्व भांडवल मातीमोल झाले आहे. वादळी वार्यात लोखंडी खांबही उन्मळून पडल्याने द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत. एक-एका शेतकर्याचे दहा लाखांपासून 35 ते 40 लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. द्राक्षांच्या काड्याही गारपिटीने मोडून गेल्याने पुढील वर्षी अपेक्षित उत्पन्न निघणे मुश्किल होणार आहे. अत्यंत कष्टाने जीवापाड जपलेल्या आणि वर्षभर परिश्रम करुन दर्जेदार द्राक्षमणी तयार झालेल्या बागा जमीनदोस्त झाल्याने बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे. माण तालुक्यातील देवापूर, काळचौंडी, पळसावडे या भागात द्राक्षाबागांची लागवड करण्यात आली आहे. या भागात निसर्गाच्या अवकृपेने बहुतांशी द्राक्षबागा जळून गेल्या आहेत.
खटाव तालुक्यातील गारपिटीनंतर लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकार्यांनी पहाणी केली. महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. आता शासनाकडून द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना त्वरित आणि भरीव मदत मिळणे गरजेचे आहे.
गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. खटाव आणि माण तालुक्यात द्राक्ष बागांसह झालेल्या इतर नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे.
प्रांताधिकारी – उज्ज्वला गाडेकर
तीस लाखांचे कर्ज घेऊन दोन एकर क्षेत्रावर द्राक्षबाग फुलवली होती. द्राक्षमणीही चांगले लागले होते. दोन दिवसांत द्राक्षे परदेशात निर्यात केली जाणार होती. मात्र, प्रचंड मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली. सुमारे तीस लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्यावी.
– उत्तम बागल, द्राक्ष उत्पादक,बोंबाळे