अकोले ( प्रतिनिधी ) – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्य सरकारच्या सहकार्याने १ लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे , अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली .
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.पाटील बोलत होते. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. बुधवारी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या काही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. पाटील यांनी सांगितले की , महामंडळाच्या ५५६ लाभार्थ्यांना कर्ज आधी मिळाले मात्र प्रमाणपत्र नंतर मिळाले . या लाभार्थ्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. आघाडी सरकारने बंद केलेली ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही महामंडळाने घेतला आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत असलेली १० लाखांची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवून कालावधी परतफेड ७ वर्षांपर्यंत करण्यात आला आहे.
मराठा समाजातील छोटे मोठे व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या तरुणांना बळ देण्यासाठी लघु कर्ज योजनेची सुरुवात करण्यात येणार असून त्या अंतर्गत २ लाखांपर्यंत कर्ज देण्यात येईल. या कर्जावरील व्याज परतावा महामंडळ देईल. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होणार आहे ,असे श्री. पाटील यांनी नमूद केले. शिंदे-फडणवीस सरकार हे मराठा समाजाची आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. महामंडळ कर्ज योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत यांच्या उपस्थितीत सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या संबंधित अधिका-यांसोबत बैठक घेणार असल्याचे श्री. पाटील म्हणाले.
मराठा समाजसाठी नरेंद्र पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व गाय गोठा यासाठी बिगरव्याजी कर्ज योजना सुरु व्हावी अशी मागणी होती ट्रॅक्टर ची मागणी पूर्ण झाली असून लघु उदयोग साठी दोन लाख रुपये कर्ज हि मिळणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे पाटील