देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
राहुरी तालुक्यातील काही भागात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले या वादळीवाऱ्यासह पावसाने तालुक्यातील राहुरी, टाकळीमियाँ, मुसळवाडी परिसरात शेतकऱ्यांचा कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.तर या भागात अनेक घरावरील पञे उडाल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहे.वादळामुळे महावितरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन विज खंडीत झाला होता.विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण प्रयत्न करीत होते.राहुरीत नव्याने दाखल झालेले तहसीलदार चंद्रसिग राजेंद्रसिंग राजपूत यांनी राञी अंधारात पाहणी करुन नागरिकांना धीर दिला.
बुधवारी सायंकाळी वादळीवाऱ्यासह पावसात अनेक मोठे वृक्ष रस्त्यावर उनमळून पडल्याने राहुरी महाविद्यालय, राहुरी न्यायालय आवारात अनेक झाडे उमळून पडले. येथिल नाझर सातपुते चारचाकी गाडीत बसल्यानंतर गाडीवर झाड कोसळत असताना दिसल्यावर त्यांनी गाडीतुन उडी मारल्याने सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. टाकळीमियाँ ते मुसळवाडी रस्तावर मोठ मोठी वृक्ष उमळुन पडल्याने वाहतुकीसाठी बंद होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील टाकळीमियाँ, मुसळवाडी परिसरामध्ये सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान अचानक सुसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.यावेळी आकाशात विजेचा मोठ्या प्रमाणात आवाज येत होता. अचानक आलेल्या अवकाळी संकटामुळे शेतामध्ये पडून असलेले अनेक शेतकऱ्यांचे कांदे पावसात भिजले. तसेच अनेक आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक घरावरील तसेच शेडवरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे वृक्ष कोलमोडून पडले आहेत.राहुरी शहरासह मुसळवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह शहरातील नविपेठ,काॅलेज रोड,रेल्वे स्टेशन रोड, बारागाव नांदुर रोड, मल्हार वाडी रोड, तनपुरे वाडी रोड, पिंपळाचा मळा रोड या रस्त्यावरती वृक्ष उन्मळून पडली होती. यामधे काही शेतकरी व नागरिकांच्या घरांची छतावरिल पत्र उडून गेली राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.यामधे कुठलीही जिवित हाणी झाली नसल्याचे समजले आहे.शहरातील भळगट हॉस्पिटल येथील एक मोठे वृक्ष पडल्याने या भागातील दोन-तीन कुटुंबीयांची पडझड होऊन घराचे नुकसान झाले आहे.
वादळाचा तडाखा सर्वाधिक महावितरणास बसला आहे.महावितरणाचे अनेक ठिकाणचे विद्युत पोल मोडले तर काही वाकले होते विजेच्या तारा तटुन पडल्या होत्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. टाकळीमियाँ गावाची यात्रा असल्याने या ठिकाणी रहाटपाळणे आले होते. त्यातील एक मोठे रहाटपाळणे सुसाट वाऱ्यामुळे पडल्याची घटना घडली आहे. वादळी पावसात या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बुधवारी राञी उशिरा पर्यंत तहसीलदार चंद्रसिग राजेंद्रसिंग राजपूत यांनी अनेक भागात भेट देवुन पाहणी केली. घरावरील पञे उडाल्यामुळे बेघर झालेल्या नागरिकांना तहसीलदार रजपूत यांनी धीर देवुन पाहणी करुन पडझडीचे पंचनामे करण्यास सांगितले आहे.
नगर मनमाड रोड लगत असलेल्या अनेक हॉटेल, मंगल कार्यालय, गॅरेज, शेती औजारे दुकाने व छोटे मोठे उद्योजक कांची मोठमोठे लावलेले डिजिटल बॅनर रस्त्यावर पडले यामुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकविलेले शेतीमाल या निसर्गाच्या कोपामुळे मातीहीन झाला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन कशीतरी आपली पिके उभी करून आपली उपजीविका भागवत असताना निसर्ग कोपला अनेक नागरिकांची घराची छते उडून गेली आहे. अशाप्रकारे राहुरी तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मोठं शेतकऱ्यांचे व नागरिकांचे कालच्या झालेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात न भरून येणारे नुकसान झाले आहे. नागरिकांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.