संगमनेर : दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा सलग दोन दिवस पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या तरुणा विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
अमान शब्बीर सय्यद (रा.कब्रस्तान जवळ, नाईकवाडपुरा, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. नेहमी गजबजलेल्या नवीन नगर रोड परिसरात गेल्या चार पाच दिवसापासून एका दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा अमान सय्यद हा तरुण पाठलाग करत छेड काढत होता. नुकतेच बारावीचे पेपर दिलेली साडे सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी नवीन नगर रोड परिसरातील एका दुकानांमध्ये काम करत असून बुधवारी डोक्यात मुस्लिम समाजात घातली जाते तशी पांढरी टोपी घातलेला तरूण या मुलीकडे बघत एक सारख्या फेऱ्या मारत हाताच्या इशाऱ्याने तिला हाय करत होता. संध्याकाळी सातच्या सुमारास ही अल्पवयीन मुलगी घरी जात असताना या मुलाने तिचा छुपा पाठलाग करत छेड काढली .नवीन नगर रोडवरील प्रशासकीय इमारती जवळ त्याने पुन्हा तिचा पाठलाग केल्याने तिने त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो तिथून पळून गेला. घरी गेल्यानंतर मुलीने हा प्रकार आपल्या आई व बहिणीला सांगितला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी हा तरुण पुन्हा दुकानासमोर आल्यानंतर मुलीने फोन करून याची माहिती घरच्यांना दिली. संध्याकाळी ही मुलगी घरी परतत असताना तिची आई आणि बहीण तिच्या मागे काही अंतरावर होते. या दरम्यान हा तरुण पुन्हा तिचा पाठलाग करत असताना मुलीच्या आई व बहिणीने या तरूणाला एका रुग्णालयासमोर पकडले असता तो त्यांच्या तावडीतून निसटून पळून जाऊ लागला. त्यावेळी परिसरातील काही लोकांनी त्याला पकडले. त्यातील काहींनी त्याला मारहाण देखील केली. तेथून त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस चौकशीत त्याने त्याचे नाव अमान शब्बीर सय्यद असल्याचे सांगितले. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आरोपी सय्यद याच्या विरोधात छुपा पाठलाग करणे, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास शहर पोलीस करत आहेत. दरम्यान अशा वाढत्या घटनांनी मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.