तालुक्याच्या मानगुटीवर घोंगावणारे”प्रवरेचे वादळ” रोखण्यात आमदार थोरात समर्थक शिलेदारांना यश..!

0

निकटवर्तीयांच्या दारूण पराभवामुळे विखे गटाला संगमनेरात हादरा..!

संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगर पालिकेच्या निवडणुकीची दिशा ठरवणाऱ्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेले पंधरा दिवस आजी-माजी महसूलमंत्र्यांमध्ये आर-पार ची लढाई रंगली होती. दोघेही राज्याच्या राजकारणात मातब्बर नेते असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याबरोबरच राज्याचे लक्ष लागले होते, मात्र माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या बहाद्दर उमेदवारांनी मंत्री विखे पाटील यांच्या उमेदवारांना निवडणुकीत नुसते लोळवलेच नाहीतर, अक्षरशः पळता भुई थोडी केली. त्यामुळे आपल्या निकटवर्तीयांच्या माध्यमातून “लढाई”करून संगमनेरवर  “चढाई” करण्याच्या प्रयत्नात मंत्री विखेंची दमछाक झाली त्यामुळे विखे गटाच्या जनसेवा मंडळाच्या उमेदवारांची घसरगुंडी झाली. परिणामी बाजार समिती निवडणुकीत निकटवर्तीच्या दारूण पराभवामुळे विखे गटाला हादरा बसला असून भविष्यात होऊ घातलेल्या विविध निवडणुकात विखे गटाचा कस लागणार हे आता स्पष्ट झाले आहे.संगमनेरच्या सुज्ञ मतदारांनी तालुक्याच्या मानगुटीवर घोंगावणारे “प्रवरेचे वादळ” तालुक्याच्या सीमेवरच रोखण्यात यश मिळवले. 

             माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दोन-चार बड्या लोकांना बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी दिली होती, मात्र त्याचबरोबर बहुतांश गरीब घरातील उमेदवार या निवडणुकीत उभे केले होते, या उमेदवारांपुढे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यातील त्यांचे जवळचे, नेतृत्वाची क्षमता असणारे निकटवर्तीय सवंगडी आत्मविश्वासाचे “टॉनिक” देत बाजार समितीचे मैदान मारण्यासाठी उभे करून आ.थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळापुढे ”तगडे” आव्हान उभे करत आमदार थोरात यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्या तोंडाला फेस आणण्याची व्युहरचना केली होती. मात्र निकालानंतर त्यांच्याच उमेदवारांना तोंड लपवण्याची वेळ मतदारांनी आणली. 

         दहा वर्षांपूर्वी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष आणि संगमनेरातील बडे प्रस्थ डॉ.अशोक इथापे, ज्येष्ठ विधीज्ञ आणि शहर भाजपाचे अध्यक्ष ॲड.श्रीराम गणपुले, गत विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर उमेदवारी केलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शरद गोडेॅ, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड.रोहिणीताई निघुते, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते भीमराज चत्तर अशा मातब्बर उमेदवारांना मंत्री विखे पाटील यांनी भाजपा प्रणित जनसेवा मंडळातून उमेदवारी देऊन सत्ताधारी महाविकास आघाडी प्रणित आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला.सुरुवातीला बाजार समितीची यंदाची ही निवडणूक चुरशीची होईल असे बोलले जात होते मात्र निकालानंतर हा गोड भ्रम असल्याचे निदर्शनास आले. मतदारांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या नाका तोंडात पाणी घालत शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांना डोक्यावर घेतले. भोपळाही फोडू न शकल्याने जनसेवा मंडळाच्या उमेदवारांनी आणि पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या पहिल्याच निवडणुकीच्या माध्यमातून आत्मविश्वास गमावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विखे प्रणित जनसेवा मंडळाकडून प्रमुख नेत्यांची व कार्यकर्त्यांची उमेदवारी असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती, कारण भविष्यात येऊ घातलेल्या विविध निवडणुकावर याचा प्रभाव पडणार होता मात्र त्यांच्या अपेक्षावर मतदारांनी पाणी फेरले आहे. जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना पाचशे मते मिळवण्यापर्यंत ही मजल मारता आली नाही. जनार्दन आहेर यांना (४८०), डॉ.अशोक इथापे (४३०), ॲड.श्रीराम गणपुले (४०९), भीमराज चत्तर (४०४),  काशिनाथ पावसे (३८१), ॲड.रोहिणीताई निघुते (४४६), शरद गोडेॅ (४३५), संदीप देशमुख (३७९), इतक्या मतावरच या प्रमुख उमेदवारांना मजल मारता आली. हमाल-मापाडी मतदारसंघात तर जनसेवा मंडळाचे सोमनाथ दिघे यांना केवळ (१) मत मिळाल्याने नामुष्की जनक पराभवाला सामोरे जावे लागले.  शेतकरी विकास मंडळाचे सोसायटी मतदार संघातून शंकरराव खेमनर(११३०),कैलास पानसरे (१०९४),मनिष गोपाळे (१११६), सुरेश कान्होरे(११५०), सतिश खताळ (११४०),गिताराम गायकवाड (११२९),विजय सातपुते(१०४९),महिला मतदारसंघातून दिपाली वर्पे(११८१),रुख्मिणी साकुरे(११६६),विजाभज मतदार संघातून अनिल घुगे(१०७९), इतर मागास मतदारसंघातून सुधाकर ताजणे(११७६),हमाल-मापाडी मतदारसंघातून सचिन कर्पे (९०) अपक्ष (थोरात गटाला पाठिंबा),ग्रामपंचायत मतदार संघातून निलेश कडलग(९३६),संजय खरात (९३०),अरुण वाघ(८४१),सखाराम शेरमाळे(८३४), 

व्यापारी मतदारसंघातून निसार शेख(३३९)

मनसुख भंडारी(३३६) यांनी दणदणीत विजय मिळवत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या उमेदवारांचा अक्षरशः धुव्वा उडवला. ही निवडणूक विखे गटाला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. त्याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात गटाचा आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचेच संगमनेर तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका आधी

मंत्री विखे पाटील यांना त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आत्मविश्वासाचे “टॉनिक” द्यावे लागणार आहे, तसे झाले नाही तर भविष्यात येणाऱ्या निवडणुका विखे गटाला सोप्या जाणार नाहीत हे बाजार समितीच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. 

चौकट :- जनार्धन आहेर यांच्यावर कारवाई होणार ?

राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षांची महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच स्थानिक पातळीवरच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेला असताना संगमनेरात मात्र शिवसेनेकडून विधानसभा लढवलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांनी मंत्री विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाकडून उमेदवारी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान कारवाई करण्याचे संकेत शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी दिले होते, आता जनार्दन आहेर यांच्यावर कारवाई होणार का ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here