वाळू धोरण जाहीर होताच राज्यातील पहिलीच कारवाई संगमनेर : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील आणि राज्यातील वाळू तस्करीला “वेसन” घातलेली असली तरी, संगमनेरात मात्र वाळू तस्करी जोमात सुरू असल्याचे खांडगाव येथे घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होत आहे. येथील प्रवरा नदी पात्रात संगमनेरच्या महसूल पथकाने मोठी कामगिरी करत १५ ब्रासचा वाळू साठा आणि तब्बल वीस लाखाचा जेसीबी जप्त केला.
चार दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्याच्या हद्दीत वाळू तस्करी आढळेल त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला होता. त्यामुळे लागलीच संगमनेरचे महसूल प्रशासन खडबडून जागे झाले, त्यातच तालुक्यातील खांडगाव येथील प्रवरा नदी पात्रामध्ये चेतन साकुरे हा जेसीबी यंत्राच्या साह्याने अवैद्यरित्या वाळूचा उपसा करत असल्याची माहिती नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, कामगार तलाठी रामदास मुळे, बाबासाहेब नरवडे, युवराजसिंग जारवाल हे महसूलचे पथक रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खांडगाव परिसरातील प्रवरा नदी पात्रात पोहोचले. यावेळी महसूलच्या पथकाला पाहून जेसीबी चालक जेसीबी घेऊन पळून चालला होता मात्र या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला जेसीबी सह पकडले. याच जेसीबीच्या साह्याने नदीपात्रातून वाळू काढून तिचा नदीपात्राच्या कडेला मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला होता. मात्र या कारवाई दरम्यान वाळू वाहतूक करणारी इतर वाहने घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाली. या साठवलेल्या वाळूचा आणि तेथे उत्खनन केलेल्या जागेचा सोमवारी महसूल पथकाने पंचा समक्ष पंचनामा केला तसेच पकडलेला जेसीबी संगमनेर येथील पोलीस वसाहतीमध्ये आणून लावण्यात आला आहे.दरम्यान राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा आणि राज्यभरात वाळू माफियांच्या मुस्क्या आवळलेल्या असतानाच संगमनेरात मात्र वाळू तस्कर “सुसाट”असल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे. याबाबत महसूल प्रशासन या वाळू तस्करावर काय कारवाई करते याकडे आता लक्ष लागले आहे.
चौकट : आता दुचाकी वरूनही वाळू तस्करी..!
तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील अनेक गावात आता मोठ्या वाहना ऐवजी दुचाकी वरून वाळू तस्करी सुरू आहे. हे दुचाकी वाळू तस्कर भल्या सकाळी प्रवरा नदी पात्रात उतरतात आणि दिवसभर ते आपल्या मोटार सायकलवर वाळूच्या गोण्या भरून इच्छित स्थळी नेत आहेत. दिवसभरात किमान एकदोन ट्रॉली भर वाळू हे दुचाकी वरील वाळू तस्कर खुले आम आणि बिनदिक्कत पणे प्रवरा नदी पात्रातून नेत आहेत. त्यामुळे आता दुचाकी वरून वाळू तस्करी करणाऱ्यांचा महसूल विभाग कसा बंदोबस्त करतो याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.