संगमनेर : लग्नाचे वय नसलेल्या अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या नवरदेवासह त्याचे आई-वडील आणि पीडित मुलीच्या आईवर कनोलीच्या ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील कनोली येथे बालविवाहाचा हा प्रकार समोर आला आहे. कनोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रवींद्र केशव शिंदे (वय ३८) रा. हनुमंतगाव, ता. राहाता यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २९ वर्षीय नवरदेव, त्याचे आई-वडील आणि अल्पवयीन नवरीच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसेवकाच्या फिर्यादीनुसार मंगळवार दि. २ मे २०२३ रोजी कनोली येथे आरोपी नवरदेवाच्या घरी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा बालविवाहाचा प्रकार समोर आला.याबाबत माहिती मिळाल्यानंतर ग्रामसेवक रवींद्र शिंदे यांनी आरोपी नवरदेवाच्या घरी जात अल्पवयीन नवरीचा जन्म तारखेचा दाखला आणि आधार कार्ड वरील जन्मतारखेची तपासणी केली असता नवऱ्या मुलीचे वय अवघे १५ वर्ष ८ महिने १४ दिवस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलीचे वय कायद्याने लग्न होण्या इतपत पुरेसे झालेले नसल्याने ग्रामसेवक शिंदे यांनी या मुलीच्या नवरोबासह त्याचे आई-वडील आणि अल्पवयीन नवऱ्या मुलीची आई यांच्या विरोधात फिर्याद दिली. तालुका पोलिसांनी या चारही आरोपी विरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००७ चे कलम ९,१० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर.एस सानप करत आहेत. अल्पवयीन नवरी मुलगी श्रीरामपूर तालुक्यातील असल्याचे समजते.