संगमनेर : गावातून घराकडे दुचाकीवरून जात असलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याच्या पायाला मोठी दुखापत झाली. मात्र प्रसंगावधान राखून शेतकऱ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.
याबाबतची माहिती अशी की सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आश्वी खुर्द येथील शेतकरी दामोधर विश्वनाथ क्षिरसागर हे आश्वी खुर्द येथून आपल्या घरी दुचाकीवरून जात होते. ते प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या गायकवाड वस्ती जवळ आले असता शिकारीच्या शोधात बसलेल्या बिबट्याने क्षिरसागर यांच्यावर हल्ला केला. अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्याने दामोधर क्षिरसागर घाबरून गेले. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. मात्र यावेळी बिबट्याने पंजा मारल्याने क्षिरसागर यांच्या पायाला मोठी दुखापत झाली. त्यांना आश्वी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून आश्वी खुर्द आणि परिसरात बिंबट्याचा वावर असून या भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर व पाळीव कुत्र्यांवर बिबट्यांचे हल्ले सुरूच आहेत. विशेषतः स्वामी समर्थ मंदिर ते आश्वी खुर्द ग्रामपंचायतची पाणीपुरवठ्याची विहीर या मार्गावर अनेकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने आणि या मार्गावरून नागरिकांसह शाळकरी मुले नेहमीच प्रवास करत असल्याने या मार्गावर हायमॅक्स दिवे लावण्याची मागणी आश्वी खुर्द ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान सोमवारच्या घटनेने या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.