शेतकरी हिताला प्राधान्य देवून बाजार समितीचा नाव लौकिक वाढवा- आ. आशुतोष काळे

0

राष्ट्रवादीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती, संचालकांचा सत्कार संपन्न

कोळपेवाडी वार्ताहर :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरवून शेतकरी हिताला प्राधान्य द्या. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न वाढवून बाजार समितीचा नाव लौकिक वाढवावा असा मौलिक सल्ला आ. आशुतोष काळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित उपसभापती व संचालकांना दिला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील मतदारांचे आभार व राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित उपसभापती व संचालकांचा सत्कार सोहळा कार्यक्रम नुकताच माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहाजापूर येथे पार पडला याप्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते.अध्यक्षपदाची सूचना भोजडेचे सरपंच सुधाकर वादे यांनी मांडली त्या सूचनेला विलास चव्हाण यांनी अनुमोदन दिले. या सोहळ्यात नवनिर्वाचित उपसभापती गोवर्धन बाबासाहेब परजणे, संचालक संजय माधवराव शिंदे, राजेंद्र शंकरराव निकोले, शिवाजी बापूराव देवकर,रामदास भिकाजी केकाण, ऋषिकेश मोहन सांगळे यांचा माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, शेतकऱ्यांची संस्था म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. मागील काही वर्षात कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न कमी झाल्यामुळे निवडणुक परवडणारी नव्हती. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने निवडणूक झाली मात्र सुज्ञ मतदारांनी योग्य उमेदवारांची निवड करून पक्षनिष्ठा जपली हि अभिमानास्पद बाब असून त्याबद्दल सर्व मतदार अभिनंदनास पात्र आहेत. मागील काही वर्षापासून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न कमी झाले आहे त्यामुळे उत्पन्न वाढविणे हि जबाबदारी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व संचालक मंडळाला पार पाडावी लागणार आहे. हि जबाबदारी ते चोखपणे पार पाडतील याचा मला विश्वास आहे. मागील वेळी बाजार समितीचे उत्पन्न कमी झाल्यामुळे सुट्या कांद्याची खरेदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढून बाजार समितीचे उप्तन्न पस्तीस लाखावरून साडे तीन कोटीवर गेले व शेतकऱ्यांना देखील चांगला फायदा झाला आहे. यापुढे भुसार माल, फळे  व जनावरांच्या बाजाराच्या बाबतीत असे शेतकरी हिताचे निर्णय नूतन पदाधिकाऱ्यांनी घेवून बाजार समितीची प्रगती साधावी. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु होणार आहे. मागील पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणल्यामुळे शाळा खोल्या, गावअंतर्गत रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, पाणी पुरवठा योजना, व्यायाम शाळा, स्मशानभूमी विकास आदी कामे मोठ्या प्रमाणात झाले असून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ तळागाळातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले. यावेळी उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक शिवाजी देवकर, ऋषिकेश सांगळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, सोमनाथ चांदगुडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.  

यावेळी ज्येष्ठ नेते कारभारी आगवण, बाळासाहेब कदम, एम.टी.रोहमारे,नारायण मांजरे, सोमनाथ चांदगुडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, जिल्हा प्रदर्शन चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्थेचे अध्यक्ष देवेन रोहमारे, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते आदी मान्यवरांसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ तसेच सर्व सलग्न सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सहकारी सोसायट्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांनी केले. सूत्रसंचालन अरुण चंद्रे व संदीप लासुरे यांनी केले तर आभार दिलीपराव बोरनारे यांनी मानले.  

चौकट :- पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली होती. मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिलेले सर्व उमेदवार आ. आशुतोष काळे यांचे विचार माननारे होते.यापैकी संजय माधवराव शिंदे हे देखील होते परंतु त्यांनी अधिकृत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेला नव्हता. परंतु आ. आशुतोष काळे यांची कार्यपद्धती व मतदार संघाच्या विकासासाठीची तळमळ पाहून त्यांनी या कार्यक्रमात माजी आ. अशोकराव काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांची ताकद वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here