कोळपेवाडी वार्ताहर :- एन.एच. ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार दोन दिवसांपासून सावळीविहीर ते कोपरगाव या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास राष्ट्रीय महामार्ग (सार्वजनिक बांधकाम विभाग) प्राधिकरणाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र मागील पाच वर्षात या महामार्गाकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या माजी आमदार आज खड्डे बुजवण्याचे काम सुरु असतांना केलेले आंदोलन नौटंकी असल्याची टीका राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष सौ. प्रतिभा शिलेदार यांनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्यावर केली आहे.
एन.एच.७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे हा मार्ग अतिशय धोक्याचा झाला होता. त्याबाबत अनेक सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासून कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या या सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) या मार्गाचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केला. केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांची वेळोवेळी भेट घेवून सावळीविहीर ते कोपरगाव या ११ किलोमीटर रस्त्यासाठी १७८ कोटी रुपये निधी मिळविला व त्याबाबतची निविदा प्रक्रिया देखील सुरु आहे.
परंतु रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढतच चालल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी सहा महिन्यापूर्वी सावळीविहीर ते कोपरगाव या रस्त्यावर पडलेले मोठ-मोठे खड्डे तातडीने बुजवावे यासाठी निधी उपब्ध करून द्यावा यासाठी आ. आशुतोष काळे पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याची दखल घेवून खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे कामात मोठा व्यत्यय येत असला तरी पावसात देखील मागील दोन दिवसांपासून जीएसबी मटेरिअल वापरून खड्डे बुजवले जात आहे. पाऊस थांबल्यानंतर डांबर व खडीने खड्डे बुजवले जाणार आहेत. सध्या मागील दिवसांपासून राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. कोपरगाव तालुका देखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे या मार्गावरील सर्वच खड्डे हे येत्या काही दिवसात पूर्णपणे बुजविले जाणार आहे. या कामाचे गाडे या कंपनीला हे खड्डे बुजविण्याचे काम देण्यात आले असून हे काम सध्या सुरु आहे मात्र सुरु असलेल्या पावसामुळे काही प्रमाणात व्यत्यय येत असला तरी खड्डे बुजविण्याचे काम सुरु राहणार आहे. अशा परिस्थितीत माजी आमदार खड्डे बुजवा यासाठी आंदोलन करतात याला नौटंकी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? असा प्रश्न शिलेदार यांनी उपस्थित केला आहे.
हे खड्डे एवढे मोठे होण्याला तर खऱ्या अर्थाने माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हेच जबाबदार आहेत. मागील पाच वर्षात गल्लीपासून दिल्ली पर्यंत त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना देखील त्यांना या रस्त्याचा प्रश्न सोडविता आला नाही. हे कोपरगावच्या जनतेच्या दुर्दैव आहे. मागील पाच वर्षात त्यांनी या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने पाहिले असते तर अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला नसता व नागरिकांना सध्या होणारा त्रास देखील वाचला असता. त्यावेळी त्यांनी आंदोलन केले असते तर आज त्यांना खड्ड्यात बसायची देखील वेळ आली नसती. आपले मागील पाच वर्षाचे अपयश झाकण्यासाठी त्यांनी केलेले आंदोलन हे जनतेच्या डोळ्यात धूळफेक असून त्यांची आंदोलनाची वेळ चुकली आहे. मात्र माझ्यामुळे खड्डे बुजविले गेले हे जनतेला सांगण्यासाठी त्यांचा आजचा आटापिटा असल्याचे सौ. प्रतिभा शिलेदार यांनी म्हटले आहे.