रायगडावर उद्या 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

0

मुंबई, संदिप शिंदे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शुक्रवारी (2 जून) किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
             सकाळी 8.30 वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
            छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा 2 व 6 जून 2023 रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. या शिवराज्याभिषेकाला शासनाचे प्रतिनिधी म्हणून केंद्र आणि राज्य शासनाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृतीमंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे तसेच इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या मार्गांनी रायगड किल्ल्याकडे येणार्‍या शिवभक्तांसाठी सोयीस्कर वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, नातेखिंड या मार्गाने येणार्‍या वाहनांकरिता कोंझर पार्किंग क्रमांक एक व कोंझर पार्किंग क्रमांक दोन, वालसुरे पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई, पेण, कोलाड, माणगाव, धनगर फाटा, कवळीचा माळ तसेच पुणे, ताह्माणी, निजामपूरमार्गे येणार्‍या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था ही कवळीचा माळ आणि पाचाड बौद्धवाडी शिवसृष्टीच्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पाच दिवस अवजड वाहनांना बंदी

किल्ले रायगड येथे 2 ते 6 जूनदरम्यान 350 वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याला रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि मुंबई या ठिकाणांहून मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी ते पळस्पे, वाकण फाटा ते खोपोली आणि पळस्पे ते खारपाडा टोल नाकादरम्यान अवजड वाहने, ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर अशा वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्तांच्या वाहनांचा ताफा येणार आहे. हे लक्षात घेता रायगडचे अप्पर दंडाधिकारी यांनी तसा अहवाल पोलिसांना दिला आहे.

350 सुवर्णहोन संभाजीराजे यांना सुपूर्द

महाड : दुर्गराज रायगडवर 6 जून रोजी मराठी पंचांग तिथीनुसार संपन्न होणार्‍या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्तच्या शिवउत्सवमूर्तीला अस्सल सोन्यापासून बनवलेल्या 350 सुवर्ण होनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात येणार आहे. चंदूकाका सराफचे संचालक सिद्धार्थ शहा यांनी हे सुवर्ण होन रायगड विकास प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा लोकोत्सव दुर्गराज रायगड शिवराज्याभिषक सोहळा समितीचे प्रमुख संभाजीराजे यांच्याकडे मंगळवारी सन्मानपूर्वक सुपूर्द केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here