भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी नवी दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
बीड : या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब आहे. सरकारनं खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, असं स्पष्ट मत डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केलं. आतापर्यंत कुणाही मंत्र्यानं किंवा खासदारानं आंदोलक कुस्तीपटूंना पाठिबा दर्शवलेला नाही. अशा स्थितीत भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी घेतलेल्या या भूमिकेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
बीड येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत प्रीतम मुंडे बोलत होत्या. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगिनी असलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांची ही भूमिका म्हणजे भाजपला घरचा आहेर असल्याचं म्हटलं जात आहे.
यावेळी डॉ. प्रीतम मुंडे यांनी सरकारकडून कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच गेले नसल्याबाबत खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “खेळाडूंच्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीत ते स्वागतार्ह नाही.” या निमित्ताने खेळाडूंच्या बाजूने बोलणाऱ्या प्रीतम मुंडे या भाजपमधल्या पहिल्याच नेत्या ठरल्या आहेत.
महिला खेळाडूंशी संबंधित प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. मुंडे यांनी म्हटलं, “खासदारच नव्हे तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. अशा आरोपांची चौकशी वेळेवर होऊन सत्य समोर यायला हवं होतं. सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणीच गेलं नाही. ते व्हायला हवं होतं. या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी.”