मुंबईत लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलेची पार्टनरनेच केली हत्या …

0

मृतदेहाचे तुकडे करुन कुत्र्यांना खाऊ घातल्याचा संशय ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : मीरा रोड परिसरात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एक 32 वर्षीय महिलेची तिच्या सोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या पार्टनरनं हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

पण चार दिवसांनंतर घरातून येणाऱ्या घाण वासामुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि घडल्या घटनेचा उलगडा झाला.

मीरा भाइंदर पोलिसांनी मनोज साने या 56 वर्षीय व्यक्तीला आता अटक केली आहे आणि नया नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून पुढचा तपास सुरु केला आहे. सरस्वती वैद्य असं 32 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. संशयित मनोजला ठाणे येथिल कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला 16 जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

काल (7 जून) रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर आता पोलीस तपासात त्याचे अधिक धक्कादायक तपशील पुढे येत आहेत. सरस्वती यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे करण्यात आलेले तुकडे पोलिसांनी त्यांच्या फ्लॅटमधून गोळा केले आहेत. ते पिशव्यांमध्ये भरुन ठेवले होते आणि घराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पसरले होते. शरीराच्या काही भागांची विल्हेवाट अगोदरच लावण्यात आली होती असंही आता समजतं आहे.

पण या हत्येमागचं आणि त्यानंतरही निर्घृण वर्तनाचं कारण अद्याप पुढे आलेलं नाही. गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असणाऱ्या या दोघांमध्ये नेमकं काय झालं की प्रकरण एवढ्या टोकाला गेलं याचा पोलिस अद्याप तपास करत आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात अशाच प्रकारची मृतदेहाचे तुकडे करण्याची निर्घृणता पहायला मिळाली होती. त्यानंतर सरस्वती वैद्य यांच्या बाबतीतही तसंच घडलं आहे.

‘2014 सालापासून एकत्र राहत आहेत’

हत्येच्या आरोपाखाली मनोज सानेला संध्याकाळी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयानं त्याला आठ दिवसांच्या पोलिस कस्टडीमध्ये पाठवलं. अर्थात साने आणि वैद्य यांच्याबद्दल अधिक माहिती पोलीस अद्याप गोळा करत आहेत आणि हत्येमागचं नेमकं कारण काय हेही शोधण्याच्या प्रयत्न करत आहेत.

साने याला पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यानंतर मीरा भायंदरचे पोलिस उपायुक्त जयंत बजबाले यांनी सांगितलं की पोलिसांना अजून खोलात जाऊन तपास करायचा आहे.

“त्यांच्यातलं भांडण वगैरेंबद्दल आरोपी सांगतो आहे पण आम्हा हे सगळं तपासण्यासाठी वेळ हवा आहे. अजून नेमका हेतू आम्ही शोधतो आहोत. या आठ दिवसांच्या कोठडीत आम्ही चौकशी करू. हे दोघंही 2014 सालापासून एकत्र राहत होते.,” असं बजबाले यांनी सांगितलं.

सरस्वती वैद्य मनोज सानेसोबत एकत्र राहण्याअगोदर एका अनाथाश्रमात राहत होत्या अशी माहिती समोर येते आहे.

“मयत वैद्य यांच्या कुटुंबांबद्दल अद्याप पूर्ण माहिती नाही. त्या एका आश्रमात राहात होत्या हे खरं आहे. आम्ही अजून चौकशी करतो आहोत. या दोघांची एका किराणा मालाच्या दुकानात ओळख झाली असं साने सध्या सांगतो आहे पण आम्ही ते तपासून पाहत आहोत. तो त्या दुकानात काम करायचा,” असं बजबाले यांनी सांगितलं. आपण ही हत्या न करता वैद्य यांनी आत्महत्या केली असा दावा साने यानं केल्याच्या बातम्याही आल्या. त्यावर बजबाले म्हणाले, “असं अजून काहीही निष्पन्न झालेलं नाही. आम्ही हत्येचा गुन्हा नोंदवून त्या दिशेनं तपास करतो आहोत.”

‘काल सकाळपासून वास येऊ लागला’

मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे गेल्या तीन वर्षांपासून मीरा रोड इथल्या गीता आकाशदीप या सोसायटीमध्ये फ्लॅट क्रमांक 704 इथे राहात होते. तिथेच हे सगळं प्रकरण घडलं आहे. या इमारतीतल्या इतर रहिवाशांनी काही माध्यमांना सांगितल्याप्रमाणे काल (7 जून) ला सकाळपासून या फ्लॅटमधून घाण वास येऊ लागल तशी सगळ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. या रहिवाशांच्या मते या दोघांचे इमारतीत इतर कोणाशी फारसे संबंध नव्हते त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक काही त्यांना माहित नव्हतं.

या दोघांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशानं सांगितलं की सकाळपासून वास येऊ लागल्यावरही घर उघडेपर्यंत संध्याकाळ झाली होती. “आम्हाला अगोदर वाटायचं की ते दोघं विवाहित आहेत. पण त्यांच्या संबंधांबद्दल आम्हाला माहिती नव्हती. आमचा त्यांच्याशी क्वचितच बोलणं व्हायचं. काल सकाळी घाण वास येऊ लागला तेव्हा वाटलं की कुठं एखादप प्राणी मरुन पडला असेल. बाकी सगळी घर उघडी होती. केवळ सानेंचाच फ्लॅट क्रमांक 704 बंद होता. जेव्हा माझ्या मुलानं दार वाजवून त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी (मनोज) म्हटलं की संध्याकाळी आल्यावर ते सगळं व्यवस्थित करतील. मग लगेच रुम फ्रेशनर फवारुन कुलूप लावून तो निघून गेला,” असं हे रहिवाशी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here