कोपरगाव(वार्ताहर) : चालू वर्षी हवामान विभागाचा अंदाज चुकत असून जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी अजून पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र काल गोदावरी उजव्या कालव्याचे चौथ्या आवर्तनाचे पाणी सोनेवाडी पोहेगांव परिसरात दाखल झाल्याने शेतकऱ्यांना आता शेती पिकांना पाणी देण्यासाठी दिलासा मिळाला आहे. मागच्या वर्षी जूनच्या पहिल्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन मका व इतर हंगामी पिकांची पेरणी केली होती मात्र चालू वर्षामध्ये अजूनही पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले ऊस ,घास , इतर चारा पिके, भाजीपाला व फळबागांना पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी कालव्या लागत असलेला परिसर हा दुष्काळी परिसर असल्याने ब्रिटिशांनी या परिसरात दारणा गंगापूर धरणाची निर्मिती करून गोदावरी कालवे आणले. त्यामुळे येथील शेती सुजलाम सुफलाम झाली.मात्र पाटबंधारे विभागाच्या अनेक वेळा ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी देण्याच्या समस्या निर्माण होत होत्या. मात्र चालू वर्षी पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी आवर्तनाचे योग्य नियोजन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.सध्या शेतात उभ्या असलेल्या पिकांना पाणी देणे गरजेचे असल्याने व पाऊस लांबल्याने गोदावरी आवर्तनाचे पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.पाटबंधारे विभागाने या आवर्तनाचे योग्य नियोजन केले तर हरिसन ब्रँच चारी, नऊचारी व 27 चारी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना या आवर्तनाचा निश्चित फायदा होणार आहे.