‘एखाद्या जाहिरातीमुळे काही होईल इतकं तकलादू सरकार नाहीये हे’- देवेंद्र फडणवीस

0

वर्तमानपत्रातील एका जाहिरातीमुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाला पुन्हा एकदा नवं वळण लागलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण व्हायला अवघे काही दिवस बाकी असताना युती सरकारमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलं होतं.

सत्ता स्थापनेसाठी वर्षभरापूर्वी एकत्र आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्वकाही आलबेल नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. पण पालघरमध्ये 15 जूनला झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर आले, आणि तिथे बोलताना त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.

पालघरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “देवेंद्रजी पाच वर्षं मुख्यमंत्री होते, त्यांच्या अनुभवाचा राज्याला फायदा झाला.

आमची युती स्वार्थासाठी झालेली नाही, सत्तेसाठी झालेली नाही, तर गेल्या 25 वर्षांपूर्वी झालेल्या वैचारिक भूमिकेतून झालेली आहे. आमचं सरकार एका विचारांचं सरकार आहे. माझी आणि देवेंद्रजींची आताची दोस्ती नाहीये, गेल्या 15-20 वर्षांपासून आम्ही मित्र आहोत.”

देवेंद्र फडणवीसांनीही जाहिरात वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आम्ही गेल्या 25 वर्षांपासून एकत्रित प्रवास करतोय पण गेल्या वर्षंभरात तो अधिक घट्ट झालाय. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याची गरज नाहीये. ते पुढे म्हणाले, आम्ही सरकार तयार केलं ते खुर्च्या तोडण्याकरता नाही, पद मिळवण्याकरीता नाही तर सामान्यांच्या जीवनात गुणात्मक बदल व्हावा म्हणून. त्यामुळे एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कोणी काही म्हणालं म्हणून या सरकारला काही होईल इतकं तकलादू सरकार हे नाहीये.”

‘त्या’ जाहिरातीनंतर अपेक्षेप्रमाणे राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या.. यात भाजपच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी ही जाहिरात आम्ही दिली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. तरीही पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातले संबंध बिघडल्याची चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here