देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील धानोरे येथे मध्यरात्री घरात प्रवेश करून कपाटातील ९ तोळे सोने आणि ५५ हजारांची रोकड चोरून नेण्याची घटना घडली असून ज्या घरात ही चोरी झाली ते घरमालक कपाटाशेजारीच झोपलेले होते मात्र, त्यांना चोरी होताना जाग न आल्याने चोरांनी त्यांच्या तोंडावर स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध करून ही चोरी केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सोनगावजवळ असणाऱ्या धानोरे येथील अरूण लहानू दिघे यांच्या वस्तीवर काल मध्यरात्री हा प्रकार घडला. अरूण दिघे आणि त्यांच्या पत्नी रंजना दिघे हे दोघे आपल्या राहत्या घरात गोदरेजच्या कपाटाजवळ झोपलेले होते. मध्यरात्री १२ च्या सुमारास त्यांच्या घरातील आजी या बाथरूमसाठी उठल्या तेव्हा त्यांनी दार उघडले आणि त्या पुन्हा झोपी गेल्या. याचदरम्यान चोरांनी घरात प्रवेश केल्याचा संशय आहे. रात्री १२.३० ते १ च्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी घरात तर घुसून गोदरेज कपाटाचा दरवाजा उघडून कपाटातील लॉकरमध्ये असणारे ९ तोळे सोन्याचे दागिने त्यात लॉकेट, अंगठया आणि ५५ हजारांची रोकड घेवून पोबारा केला. साधारणपणे १.३० ते २ वा. दिघे यांना जाग आली तेव्हा घरातील कपाट उघडे दिसले आणि आतमध्ये उचकापाचक केलेली दिसली. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कपाटाची त्यांनी तपासणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. आसपासच्या लोकांना उठवल्यानंतर आसपास पाहीले असता घराच्या बाजूला सोनं ठेवलेले पाऊच तसेच सोन्याच्या अंगठया असलेल्या प्लास्टिकच्या डब्या या रिकाम्या करून खाली टाकून दिलेल्या होत्या. अरूण दिघे आणि त्यांच्यापत्नी या अगदी कपाटाजवळ झोपलेले होते. परंतु, कपाट उघडून त्याची उचकापाचक होवूनही त्यांना आवाज आला नाही. दिघे यांच्या मते थोडाजरी आवाज झाला तरी आपल्याला लगेच जाग येते. परंतु, काल रात्री तसे झाले नाही. त्यामुळे कदाचित चोरटयांनी तोंडावर स्प्रे मारून ही चोरी केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सदर चोर हे चोरी करून जाताना त्यांनी शेजारी राहणारे रविंद्र दिघे यांच्या घराच्या मागील दरवाजाला बाहेरून कडी लावली तसेच ते दुसऱ्या एका वस्तीवर चोरीसाठी गेले.असता तेथील महिला उठल्याने चोर तेथून पळून गेले. याठिकाणच्या महिलेच्या म्हणण्यानुसार चोर ३ असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी पोलीस दुपारी दाखल झाले होते. त्याचबरोबर नगर येथील श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी पुढील तपास राहुरीचे पोलीस करीत आहेत.