तालुक्यातील १२८ गावातील १२२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई भूमिपूजन

0

सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देणारे सरकार :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा दि. ३०, –   राज्य शासन हे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला न्याय देणारे शासन आहे. गेल्या एक वर्षाच्या काळात शासनाने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पाटण तालुक्यातील मरळी, दौलतनगर येथे १२८ गावातील १२२ कोटी ५९ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे ई – भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी मुख्यमंत्री दूरदृष्य प्रणाली द्वारे सहभागी झाले होते.  

     या वेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई आदी उपस्थित होते.

    आजच्या भूमिपूजन होणाऱ्या कामामुळे १२८ गावातील लोकांना लाभ होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शासनाने अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. ३२ नव्या सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून आता ही योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू केली आहे. त्यासाठी पिवळे, केशरी शिधा पत्रिका अशी कोणतीही अट नाही. तसेच या योजनेत आता ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय सहाय्य मिळणार आहे. सिंचनाच्या सुविधा वाढवण्यात येत आहे. जलयुक्त शिवार, गाळ मुक्त धारण गाळ युक्त शिवार अशा योजना पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आज प्रशासन लोकांच्या घरी पोहचले आहे. ही एक क्रांती असल्याचेही ते म्हणाले.

   लोकाभिमुख निर्णय घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. महिलांना एस. टी प्रवासात ५० टक्के सवलत, केंद्राच्या किसान सन्मान योजनेत राज्य शासनाच्या आणखी ६ हजार रुपयांची भर घालून आता १२ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बचत गटांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी मदत करण्यात येईल. आजची वर्षपूर्ती आपण विकास कामांच्या माध्यमातून साजरी करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केले.

      यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, राज्याच्या तिजोरीत भर घालणारा महत्त्वाचा विभाग म्हणजे उत्पादन शुल्क विभाग. या विभागाने २१ हजार पाचशे कोटींचा महसूल जमा केला आहे. ही महसुलातील २५ टक्के वाढ आहे. डोंगरी विकासासाठी दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्राच्या विकासासाठी आराखडा बनवला जात आहे.कोयना, बामणोली, तापोळा, कास या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी मोठा वाव आहे. या ठिकाणी पर्यटन विकास निश्चित केला जाईल. जिल्ह्यातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडण्यात येईल. जिल्ह्यातील अनेक रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून ई भूमिपूजन कार्यक्रमास तसेच वर्षपूर्ती निमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

     यावेळी विकास कामे होणाऱ्या गावामधील सरपंच, सदस्य व पाटण विधानसभा मतदार संघातील नागरिक  मोठया संख्यने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here